गणेश सावंत-9422742810
मी पती, पुत्र, पालक एवढ्यापुरतं मर्यादित राहिलो नाही. मी समाजाला माझं माय-बाप म्हटलंय. मी त्यांचा मुलगा आहे. समाजाला मोठं करणं, समाजाला आरक्षण मिळवून देणं हे माझं ध्येय आहे. मी नुसत्या कुटुळंबात अडकून राहणार नाही. मराठ्यांसाठी मी देह खर्ची करण्यास तयार आहे. महाराज, स्वराज्यासाठी कुटुंबांपासून दोन दोन, चार चार वर्षे दुर रहायचे, मी तर त्यांचा मावळा, कुटुंबापासून मी दुर राहिलो तर बिघडलो कुठं? अकरा महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं यश 52 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाले. मात्र दुर्दैवं इंग्रजांना आणि मोघलाला लाजवेल असे कृत्य देवेंद्र फडणवीसांच्या पोलीसांनी अंतरवाली सराटीत केले. महिलांवर गोळ्या घातल्या, त्यांची डोके फोडली. भुजबळांना जेव्हा आम्ही आरक्षण दिलं तेव्हा आमची जमात सत्तेत होती. ते आम्ही आनंदाने स्विकारलं आणि पाहितलं मग आज आम्हाला गरज आहे तो आम्हाला का विरोध करतो. शरद पवारांना आरक्षण द्यायचंच होतं तर त्यांनी तेव्हाच दिलं असतं, तेव्हा का दिलं नाही? आंबेडकर त्या वाटेने का जातायत मला माहित नाही. निवडणूक लढवणं हे माझं ध्येय नाही. निवडणूक लढायचीच असती तर मी आत्ता खासदार झालो असतो. परंतू पर्याय नाही. मराठ्यांसाठी आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी वेळ पडली तर रिंगणात उतरणार. अनेकजण आमदार होण्यासाठी इच्छूक आहेत परंतू आम्ही जो उमेदवार देवू त्याच्या पाठीशी 100 टक्के नव्हे तर 82 टक्के मराठे पाठीशी राहतील, हा मला विश्वास आहे. मराठ्यांनो ही संधी सोडू नका, आपल्या लेकराबाळाच्या भविष्याचं बघा, एकीचं बळ दाखवा, आरक्षण दिलं नाही तर सत्तेत जाण्यासाठी तयार रहा. ही वेळ चुकली नाही पाहिजे असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सायं. दै. बीड रिपोर्टरला झनझनीत, सनसनीत, तिखट उत्तर दिले. सायं. दै. बीड रिपोर्टरच्या ‘थेट सवाल’मध्ये जरांगे बोलते झाले. कार्यकारी संपादक गणेश सावंत यांनी घेतलेली ही मुलाखत.
प्रश्न : मराठा आंदोलक मनोज जरांगे ही ओळख महाराष्ट्राला आहे, परंतु पुत्र, पती, पालक म्हणून जरांगे कशे आहेत?
उत्तर : आता त्या भूमिकेकडे जाण्याची, अथवा त्या विचारात जाण्याची गरज नाही. सध्या मी त्या भूमिकेत नाही. माझी भूमिका एकच आहे, सध्या ती म्हणजे मी मुलाच्या भूमिकेत आहे. मी समाजाचा मुलगा आहे, पालकाच्या भूमिकेत जाणं अथवा परिवाराच्या भूमिकेत जाणं म्हणजे मी कुठेतरी स्वार्थी झालो. परिवार मोठा करायला निघालो किंवा माझ्या कुटुंबाची हौस पूर्ण करायची असा त्याचा अर्थ होईल. आता मी सर्व समाजाला मायबाप मानतो त्यांच्यासाठीच काम करतो, त्यामुळे मी आज तरी केवळ आणि केवळ समाजाचा मुलगा म्हणून वावरत आहे आणि त्याच भूमिकेत आहे. आणि मुलाचे कर्तव्य असतं जेव्हा समाजाला परिवार म्हणून पाहिलं जातं तेव्हा त्या समाजावर काही अडीअडचण आली, संकट आले तर त्या संकटातून त्या समाजाला बाहेर काढणे, त्याला शक्ती देणे, बळ देणं, ताकद देणे त्याचबरोबर त्या परिवाराच्या पाठीशी उभा राहणं तो खरा मुलगा असतो आणि त्या मुलाच्या भूमिकेत मी सध्या आहे. माझा समाज दारिद्र्यात नसताना त्या समाजाला दारिद्र्यात लोटलं गेलं. त्या दारिद्र्यातून माझ्या समाजाला मला बाहेर काढायचे आहे आणि त्याला शक्ती द्यायची आहे. शंभर टक्के माझा समाज बलशाली आणि ताकतवर बनवणार आहे. त्यामुळे थोड्याशा कौटुंबिक स्वार्थाला मी सध्या तरी बाजुला ठेवलं आहे. कुटुंबात अत्यंत अडचणीचा प्रसंग असेल तेव्हा कुटुंबाकडेही जातो.
प्रश्न : माणूस म्हणून आम्हाला एक प्रश्न पडलाय, आपण कितीही कठोर असलो आपल्या समोर ध्येय असले तरी आपण आपल्या कुटुंबाकडे मागे वळून पाहतो. आजच्या परिस्थितीत तुमचे मन तुमच्या कुटुंबाबाबत काय सांगते? तुमच्या हृदयाचा तो ओलावा आम्हाला ऐकायचाय?
उत्तर – असं काही नसतं, आपण नेहमी बोलतो ना, समाजात बोलताना आपण सहज बोलतो आम्ही छत्रपतींना दैवत म्हणतो छत्रपतींच्या विचारांवर चालतो मग आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपण खरंच छत्रपतींच्या विचारावर चालतो का? आणि मी कुटुंबापासून किती लांब गेलो एक दोन वर्षासाठी लांब गेलो, माझ्या छत्रपतींनी सुद्धा दोन दोन चार चार वर्ष आपल्या परिवारापासून दुर रहात लढाया केल्याच. आपल्या राजेंनी सुद्धा कुटुंबाला प्रथम प्राधान्य दिलं नाही, स्वराज्याला प्रथम प्राधान्य दिलं. मी जर त्यांचा मावळा म्हणून संबोधित असेल आणि मी जर समाजाला परिवार म्हणत असेल तर मग मी माझ्या कुटुंबाबाबत माझ्या मनात ओलावा का निर्माण व्हावा? मग मी काय नुसता स्वतःच्या परिवाराला मोठं करण्यासाठीच लढावं का? मी जर समाजाला परिवार मानत असेल तर मग मी त्या समाजासाठीच का लढू नये! का झिजू नये आणि मी का माझ्याच कुटुंबात गुंतून पडावं? मी माझ्या कुटुंबात गुंतून पडलो तर दोन चार लोकांना मी मोठं करेल परंतु समाजाच्या वाट्याला आलेले दुःख, त्या दुःखाला हुंकार कोणी घालायची? समाजाला झालेल्या वेदना, दुःख, त्यांचा आक्रोश शेकडोने आरक्षणासाठी दिलेले बलिदान हे काय नुसते भाषण करण्यासाठीच आहेत का? त्या सर्व बलिदानाची जबाबदारी आपल्यावर आहे. ज्या परिवारांच्या मुलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले आहे, त्या बलिदान देणार्या मुलांचे स्वप्न साकार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. माझ्या अनेक बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं आहे, त्यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तशी तुमच्यावर आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला अथवा परिवाराला थारा देत नाही. मी कधी खोटं बोलत नाही, या आधीही मी सांगितलं 11 महिने झालं या आंदोलनाला समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या कालावधीमध्ये पाच सात वेळेस मी माझ्या कुटुंबाकडेही गेलो आणि कुटुंबाकडे जाण्यासाठी कारणे तेवढीच महत्त्वाची होती. कधी मुलीचा हात मोडलेला होता, मुलगा अॅडमिट होता, विशेष म्हणजे 15 दिवस मला माहित नव्हतं. जेव्हा मला माहित झालं तेव्हा मी तिकडे गेलो. जशी परिस्थिती आली तशी मी एक दोन वेळेस गेलो. नाही गेलो असं नाही परंतु क्षत्रियांचा धर्म आहे एकदा मैदानात उतरल्यानंतर मग रडत बसायचं नाही, पुढे चालत राहायचं कुटुंब म्हणून त्यांच्याकडे गेलो दोन घंटे बसलो त्यांना धीर दिला आणि वापस आलो. पुन्हा मी तेच सांगतोय क्षत्रियांचा धर्म असा आहे की, एकदा मैदानात उतरलं तर लढून मरायचं नाही तर विजयाचा गुलाल लावून यायचं! शेवटपर्यंत मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी आता मागे हटणार नाही.
प्रश्न : उभारलेला सामाजिक लढा, हे ध्येय होते की अपघाताने हा लढा मोठा झाला?
उत्तर : अपघाताने कुटुंब मोठं होऊ शकतो, अपघाताने किंवा नाईलाजाने एखादं काम हाती घेतलं तर ते शेवटपर्यंत जाईलच का त्याचे धागे दोरे हाती लागत नसतात. परंतु ध्येयाने जेव्हा एखादं काम हाती घेतलं जातं तेव्हा ते काम पूर्णत्वाकडे न्यावच लागतं. हेच पहाना एखाद्याला सुविधा दिल्या जातात तेव्हा आम्ही काही म्हणत नाही, आम्ही आमच्या समाजाला सुविधा मिळाव्यात आमचे हक्क आम्हाला मिळावेत यासाठी प्रयत्न करतोय, यासाठी रस्त्यावर उतरत आहोत आणि आपल्या समाजासाठी आपण का नाही लढावं? एखाद्या नेत्यांनी मराठ्यांना जवळ घेतलं आणि त्या मराठ्यांचा वापर केवळ स्वतःपुरता केला किंवा आपल्या बळावर त्यांनी स्वतःची जात मोठी केली मग आपली ताकद आपल्या जातीसाठी का नाही वापरायची? मला पहिल्यापासूनच खदखद होती, आपल्या मुलांमध्ये क्वॉलिटी आहे, टॅलेंट आहे. आपले मुलं कष्ट करतात मग ते नोकरीत का जात नाहीत? का उच्च शिक्षण घेत नाहीत? का शेतकरी मराठाच आत्महत्या करतो? बाकीच्या समाजात आत्महत्या का होत नाहीत? तर त्यांचा घरातला एक तरी व्यक्ती नोकरीला असतो म्हणून ते निश्चिंत असतात. शेती आहे आणि दुसरीकडे नोकरी आहे. राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत, त्यात सगळं आलं. नेमकं या सर्व सुविधा माझ्या समाजाला का नाहीत? मग त्या सुविधांसाठी आपण लढलं पाहिजे म्हणून आपला समाज मोठा झाला पाहिजे, त्याला शक्ती मिळाली पाहिजे, त्याची ताकद वाढली पाहिजे. आपल्या समाजातल्या माय-बापांनी आपल्या पोरांकडून जे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी हे कुटुंब झिजले म्हणजे विशेष नाही. मी वीस बावीस वर्षापासून समाजासाठी लढत आहे, मला कितीही त्रास झाला तरी माझा समाज मोठा झाला पाहिजे हे माझे ध्येय होते आणि आहे. त्यामुळे अपघाताने लढा मोठा होत नसतो. त्यासाठी धैर्य ठेवून संघर्ष करावा लागतो.
प्रश्न : मराठा समाजासाठी एवढे उपोषण केले अशा वेळी एखाद्या व्यक्तीने नकारात्मकतेने उद्देशून तुम्हाला भाष्य केल्यावर काय वाटते?
उत्तर : नाही समाजातल्या व्यक्तींनी काही बोललं तर मला काहीच वाटत नाही, कारण शेवटी मुलाच्या भूमिकेत मी जर आलो आहे तर मला माझ्या समाजाचं बोलणं सहन करावं लागेल. काही प्रकार घडतात परंतु मी सध्या आईच्या भुमिकेत आहे. कोणी काहीही म्हटलं, कोणी कोणाबद्दलही प्रतिक्रिया दिली, हा तसा, तो असा असंही कुणी काही सांगितलं तरी मला त्या दृष्टीने पाहता येत नाही. समाजामधल्या प्रत्येकाला मी सर्वसमान पाहतो. माझ्यासाठी सर्व समाज सारखा आहे. दुःख एवढंच होतं की, कोणी माझ्या विरोधात गेलं तर ते मला चालतं, परंतु माझ्या समाजाच्या विरोधात कोणी बोललं अथवा समाजाविरोधात कोणी गेलं ते मला खटकतं. मराठ्यांसाठी एका शब्दाचा वापर सातत्याने केला जायचा, ‘‘मराठे कधी एकत्रित येत नाहीत, ते एक होत नाहीत, ती खेकड्याची जात आहे, एकमेकांचे पाय ओढतात’’ हा शब्दच मला बर्याच दिवसांपासून खटकत होता. तो शब्द मला पुसून टाकायचा होता. आता मी खात्रीने सांगतो तो शब्द मोडला गेलाय, पुसून गेला आहे. माझा मराठा समाज एक आलाय. फक्त आपल्याच लोकांनी आपल्या समाजाच्या विरोधात जाऊ नये. नसेल आपल्यामध्ये कोणाचं काही पटत, समाजाचा आनंद बघा, समाजाची प्रगती पहा, समाजाचं भविष्य पहा, तुमच्या माझ्या थोड्याशा मतभेदांमुळे, थोड्याशा स्वार्थासाठी एवढा मोठा सागरासारखा समाज हा विखरायला नको हेच माझं सांगणं.
प्रश्न : जरांगेंच्या आंदोलनाने अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले, ओबीसीतून खरंच आरक्षण मिळेल?
उत्तर : मराठ्यांना आरक्षण मिळेल का नाही, हा आताचा प्रश्न नाही, हा सुरुवातीचा प्रश्न आहे. अगोदरचा प्रश्न आहे. अण्णासाहेब पाटलांपासून जावळे पाटलांपर्यंत मोठे लढे उभारले गेले. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी कित्येकांनी बलिदान दिले. मोठमोठे लढे मराठ्यांनी आरक्षणासाठी लढले, परंतू आरक्षण मिळत नव्हतं, त्यामुळे समाजामध्ये निराशा पसरली होती. आता आपल्याला आरक्षण मिळतच नाही अशी भावना निर्माण झाली होती. मी जेव्हा आरक्षणाचा लढा उभा केला तेव्हा अनेकजण समोर नाही, पाठीमागे म्हणायचे, आतापर्यंत मराठ्यांना आणक्षण मिळालं नाही आता काय मिळणार? काही लोक मला वेड्यात काढायचे. तेव्हा मी त्यांना म्हणायचो, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, आरक्षण कसं मिळत नाही हे मी बघतो. त्यामुळे आरक्षण मिळणार का हा तेव्हाचा प्रश्न होता परंतु आता आरक्षण मिळालं आहे. राज्यामध्ये गावेची गावे ओबीसी आरक्षणामध्ये निघालेले दिसतील. माझं जीवन खरंच सत्कर्मी लागलं आहे, मी समाजाच्या कामासाठी फुल ना फुलाची पाकळी एवढे काम केलं आहे. आता या आंदोलनामध्ये माझा जीव गेला, माझं काहीही झालं तरी आरक्षणाची वाट मी पाडून दिली आहे. माझ्या समाजाने त्या वाटेवर जायचं आहे, लढायचं आहे, मराठ्यांना मान्य नाही दहा टक्के आरक्षण परंतु नाविलाज आहे. आतापर्यंत सरकार सांगते 57 लाख नोंदी निघाल्या आहेत म्हणून एकावर तीन प्रमाणपत्र म्हटलं तरी आज दीड करोड मराठा हे कुणबी प्रमाणपत्रानुसार ओबीसीमध्ये गेले आहेत. मिळालेले दहा टक्के आरक्षण आणि ओबीसीत कुणबी म्हणून गेलेला समाज असं जर आपण हिशोब केला तर आंदोलनाला चांगलं यश आलं आहे. मी म्हणेल मराठ्यांच्या साथीने शंभर टक्के यशस्वी झालेलं देशातलं हे पहिलं आंदोलन असेल आंदोलन कधीच 100% यशस्वी होत नसते दहा टक्के आरक्षण आम्हाला मान्य नाही हा वेगळा भाग आहे. दहा टक्के दिले गेलेले आरक्षण हे टिकणार नाही, म्हणून कुणबी आणि मराठा एकच आहे यासाठी हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला अकरा महिने बरोबर झाले आहेत.
प्रश्न : तुम्ही केवळ छगन भुजबळ, देवेंद्र फडणविसांनाच टार्गेट करता, असा सातत्याने आरोप होतो?
उत्तर : अगोदर कुठं देवेंद्रांना टार्गेट करत होतो? याआधी आम्ही कधीही फडणवीस साहेबांना एका शब्दाने बोललो नाहीत. साष्टी पिंपळगावचे आंदोलन चालू होते, त्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या सरकारच्या विरोधातही आम्ही बोलतच होतो, त्यांची सुद्धा मी फजिती केली. त्यांना सुद्धा मी सोडलं नाही. मला समाजाच्या व्यतिरिक्त काहीही कळत नाही, कोण महाविकास आघाडी, कोणाची युती हे काही कळत नाही. मला एवढंच उत्तर पाहिजे की मराठ्यांना आरक्षण का दिलं जात नाही? परंतु फडणवीसांना कधीच माफ करता येणार नाही, अशी त्यांच्याकडून चूक झालेली आहे. ज्यावेळेस आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला, अंतरवाली सराटीमध्ये जो हल्ला झाला तो भयानक होता. तुम्ही राज्य चालवताय, तुम्ही राजे आहात, प्रजेकडे कसं पहायचं, कसं पाहायला हवं, राजाला दया असली पाहिजे, ममता असली पाहिजे, आंदोलनाला बसलेल्या महिलांवर पोलीसांनी अमानुष हल्ला केला. त्यांच्या अंगात, डोक्यात गोळ्या घातल्या. ती गोळ्या घालण्याची पद्धत इंग्रजांनाही लाजवणारी होती. इंग्रज कसे होते आम्हाला माहित नाही, आम्ही त्यांना बघितलं नाही परंतू इंग्रज असेच असतील असा तेव्हाचा अनुभव होता. त्यावेळेस मुघलांनीसुद्धा असा अमानुष, भयानक हल्ला केला नसेल. पोलीसांच्या हल्ल्यात महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, अबालवृद्ध जखमी झाले. तेव्हाचा तो आक्रोश आजही आठवला तर मला झोप येत नाही. एवढं झालेलं असताना, एवढ्या उच्च पदावर बसलेला व्यक्ती चालाक बुद्धीचा माणूस जेव्हा ‘माझ्या पोलिसावर हल्ला झाला’ असं म्हणतो. अरे रे पोलीस तुझे की जनता तुझी, ज्या जनतेने तुम्हाला 106 आमदार निवडून दिले, पण फडणवीस साहेब तुमच्या घरातली आई म्हणजे दुसर्याच्या घरातली ही आईच असली पाहिजे ना, महिलांचे डोके फोडणे याला राज्याचे पालकत्व म्हणतात का?
नंतर त्यांनी माफी मागितली, त्यांना चुकीची माहिती आली होती की बहुधा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता, तो नंतर दुरुस्त झाला. म्हणून त्यामुळे तो विषय सुटला त्यानंतर मी बोललो सुद्धा नाही. राहिला आता छगन भुजबळ, तो तर कुणाचंही खातो, आरक्षणाला विरोध सर्वात जास्त त्याचाच आहे. जेवढे आजपर्यंत आयोग झाले, त्या आयोगामध्ये त्याचा एक सदस्य असतो आणि तो विरोध करायला कायम पुढे असतो. जेव्हा तुम्हाला आरक्षण दिलं तेव्हा मराठ्यांनी काहीच म्हटलं नाही. मराठ्यांच्या डोळ्यादेखत तुम्हाला आरक्षण दिलं गेलं. आम्हाला कधीही वाटलं नाही त्या जातीला आरक्षण का दिलं म्हणून तेव्हा आम्ही विरोध केला असता, तेव्हा राज्यकर्ती जमात आमचीच होती. परंतू आमच्यावर संस्कार आहेत. आमच्या बापजाद्यांनी आमच्या ताटातली भाकर नेहमी गोरगरीबांना दिली, प्रेम दिलं, आमच्या लेकरापेक्षा गोरगरीबांच्या लेकरांकडे त्यांनी लक्ष दिलं. आज आम्हाला गरज आहे, आमच्या लेकरांना गरज आहे, म्हणून आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहोत. त्याला भुजबळ नेहमीच विरोध करतो. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मग त्याला मी सोडणार का? त्यांना असून ते लढाया करतात, आम्हाला नाही म्हटल्यावर आम्ही किती लढाया केल्या पाहिजेत.
प्रश्न : ओबीसी ‘आरक्षण बचाव’साठी बाळासाहेब आंबेडकरांनी रॅली काढणे सुरू केले याकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : कसं बघावं मलाच कळंना गोरगरिबांचा आवाज म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब, असं लेबल आहे त्यांना. वंचितांसाठी गरिबांसाठी खमक्या लिडर कोण असेल तर ते प्रकाश आंबेडकर साहेब. ते का त्या दिशेला वळाले आहेत हे मला नाही माहित?
प्रश्न : काल-परवा शरद पवार म्हणाले, मराठवाड्यातील जातीय स्थिती चिंताजनक, मी शांतपणे बीड, जालन्याला जाणार आणि तेथील लोकांशी संवाद साधणार, यातून काय साध्य होईल?
उत्तर : दोघांची बनवाबनवी सत्ताधार्यांची आणि विरोधकांची, आचारसंहिता लागू होईपर्यंत मराठ्यांना नादी लावायचे एवढे दोघांनी काम सुरू केला आहे सध्य.
प्रश्न : शरद पवार आज म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्या नसेल, त्यांच्या या वक्तव्याकडे कसे पाहता?
उत्तर : ओबीसीतून देतात का काय मग म्हणून साहेब आणि ते दोघं मगच मुद्दा नसेल ना मराठ्यांना ओबीसी जुनाच आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही घेणार काय महत्त्व त्यांच्या वक्तव्याला होतं तेंव्हा दिला नाही त्यावेळेस ते सत्त्तेत होते तेव्हा दिला पाहिजे केव्हा दिला नाही ना आता आता हे आहेत हेही द्यायला तयार नाहीत शरद पवार बैठकीला केव्हा येतात ते बोलावतात यांना आणि हे बोलवतात त्यांना एखादा खोडसाळ व्यक्ती असतो चहा पाजतो तिथं चहा पितो दुसर्यालाच पैसे द्यायला लावतो तसा धंदा या महाविकास आघाडीचा महायुतीचा नाटक बाजी आहे.
प्रश्न : तुम्ही सरकारला अनेक वेळा अल्टिमेटम दिले आता थेट निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले, खरचं निवडणूक लढवणार ?
उत्तर : मला माझ्या समाजाला राजकारणात न्यायचं नाही आमचा उद्देश आणि ध्येय राजकारण हे नाहीच आम्हाला आमच्या हक्काचं असणार आरक्षण पाहिजे आज काय आम्ही आरक्षणामध्ये आम्ही नवीन आहेत 1967 पासून आम्ही आरक्षणात आहोत आणि खर्या नोंदी पाहिल्या तर दीडशे दोनशे वर्षांपासून आम्ही आरक्षणामध्ये आहोत सगळ्यात अगोदर आम्ही आहोत आरक्षणामध्ये तशा नोंदी आहे तसे पुरावे आहेत आमचा आम्हाला पाहिजे बस आम्ही त्यांच्या ताटातला घेत नाहीत त्यांनी आमच्या ताटातला घेतले ताट आमचे जेवण आमचे एवढे दिवस तुम्ही खात होता आम्हाला त्याची आवश्यकता नव्हती ओबीसीतून आरक्षण आम्ही मिळून घेणार ही लढाई आता थांबणार नाही आमचा विशेष आरक्षण आहे राजकारण नाही परंतु आता देणारे तुम्ही आहेत जर सातत्याने एवढा वर्ष हा लढा चालत आहे 29 ऑगस्टला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि अखंडपणे तेवढ्याच ताकतीने चालणार हे एकमेव देशांमधलं आंदोलन आहे एवढे आंदोलन करून तुम्ही देणारच नसा समोर पर्याय दिलेला नाही मग आमचे माणसं सत्तेत गेलेच पाहिजे तुम्ही देत नाहीत म्हटल्यानंतर आमच्यासमोर पर्याय उरत नाही कोणीही मला पर्याय सांगावा त्यामुळे मग आम्हाला गोरगरिबांना निवडणुकीमध्ये उतरावंच लागेल.
प्रश्न : निवडणूक लढवण्याचे ठरवले तर एका-एका मतदारसंघात दहा-दहा इच्छुक मिळतील अशा वेळी एकाला उमेदवारी दिचल्यानंतर बाकी नाराज होणार नाहीत का? त्याचा फटका मराठ्यांच्या एकजुटीला बसणार नाही का?
उत्तर : हे पहा अशा अपेक्षा प्रत्येकाला असते कोणाच्या काय इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या मला जाणून घ्यावेच लागते परंतु एक लक्षात घ्या माझा समाज आज असा झाला आहे कुठे क्षेत्र असो सामाजिक राजकीय आर्थिक शेती नोकरी त्या क्षेत्रातला माणूस एकत्रित. आता मराठ्यांना संधी आली आहे एकिच बळ दाखवण्याची एका जागेसाठी 50 50 इच्छुक राहतील मोठा समाज आहे राजकारणाची आवड असणारा समाज आहे त्या प्रत्येकाला अपेक्षा असणार परंतु ज्या दिवशी एक नाव घोषित होईल त्या दिवशी सर्व जन सर्व काही विसरून एक होतील, स्वतःच्या जातीची शान वाढवण्यासाठी ते काम करतील, समाजाचं हसू होईल असं काम ते करणार नाहीत हा मला विश्वास आहे. तुम्हाला शंभर टक्के मराठे त्यातून काही काडले तर 82%मराठे एकत्रित चालले दिसतील हे मी आजच रिपोर्टर दैनिक आणी च्यायनल च्या माध्यमातून जाहीर सांगतो, मराठे एकतर्फी दिसतील स्वतः आमदार होऊ शकतो ही भावना विसरून मराठ्यांनी दिलेल्या नावासाठी ते काम करतील त्याच्यावर गुलाल टाकतील, जात मोठी करण्यासाठी मराठे एक होणार
प्रश्न : दस्तुरखुद्द जरांगे निवडणूक लढवणार का?
उत्तर : आत्ताच नसतो का खासदार झालो मी.. मला राजकारणाचा नादच नाही माझा जन चळवळीवर विश्वास आहे त्या चळवळीत काय ताकद आहे हे मला माहिती आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही ही जी चळवळ उभी केली आहे तिचे हे स्वरूप पाहता आलं नसत, गोरगरिबांना देणार बनव लागेल मराठा मुस्लिम धनगर यांचे प्रश्न आहेत ना, त्या मुळे जेंव्हा आमचा उमेदवार ठरेल तेंव्हा त्याच्या पाठीशी समाज उभा राहील मराठ्याची शान राखण्याची जबाबदारी सर्व मराठ्यांवर आहे. आणी ती जबाबदारी मराठ्यांना राखावी लागणार आहे.
प्रश्न : निवडणूक लढण्याचं ठरलंच तर महाराष्ट्रासाठी व्हिजन आणि विषय काय असतील?
उत्तर : ते नंतर सांगू ना, आत्ताच सर्व सांगितलं तर लई गडबड होईल. कारण राजकारणात पत्ते खोलायचे नसतात.
प्रश्न : शेवटी मराठ्यांना काय आवाहन कराल?
उत्तर : काहीच अपेक्षा इच्छा नाही माझी फक्त जातीसाठी एक व्हा तुमच्या स्वतःच्या लेकराकडं बघा त्याचे सख्खे व्हा इथं प्रत्येक जन आपल्या जातीचे पाहतो. मत मराठ्यांचे घेतो अन स्वतःच्या जातीचं तो भलं करतो मराठ्यांना आव्हान आहे आसपासचे लोक तुमच्या समोर संकट उभा करतायेत. ते आव्हान तुम्हाला स्वीकारावं लागणार आहे. हे लक्षात असुद्या मराठ्यांनो तुम्हांला जाताच तारणार आहे, आज परेंत 70 वर्ष तुम्ही दुसर्या साठी झुंज दिली एवढ्या वेळेस जातीसाठी झुंज द्यावी लागेल मागे हटून जमणार नाही गरिबांपासून श्रीमंत मराठ्यांना सांगतो आपल्याला गद्दाराच्या यादीत जायचं नाही ही आलेली संधी सोडायची नाही, भावकीचे वाद सोडा, वेसण सोडा आणी आपल्या समाजाच्या प्रगतीचे पहा कधीही एकत्रित नं होणारी जात आज एकत्र झाली आहे त्याचा फायदा आपल्याच जातीच्या पोरांना झाला पाहिजे समाजाला शक्तिशाली बनवण्या साठी हेवेदावे विसरायचे आहेत. धन्यवाद!