बीड (रिपोर्टर) महाराष्ट्र राज्यात सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवण्यात येत असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पिक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेर्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू आहेत. पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठराविक शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. पीकविमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा, काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. त्यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहतो. शेतकर्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकर्यांनी पीकपाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम ग्रहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पीकविमा योजनेत सहभाग घेत असताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाचा नोंद असलेला दाखला असण्याची गरज नाही. सदर शेतकरी स्वयं घोषणा पत्राद्वारे पीकविमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतो. मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन आयुक्त धिरजकुमार यांनी केले आहे.