केज (रिपोर्टर): नाशिक येथून लातूरकडे विदेशी दारू घेऊन जाणार्या ट्रकमधून सारुळ पाटी ते पिंपळगाव या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडून ट्रकमधील सिग्रॅम रॉयल स्टॅगचे 15 ते 20 बॉक्स चोरून नेल्याचा प्रकार काल सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदरील दारूची किंमत दीड लाखाच्या आसपास आहे.
याबाबत अधिक असे की, ट्रक (क्र. एम.एच. 20 5299) मध्ये विदेशी दारू सिग्रॅम रॉयलस्टॅग सह अन्य कंपनीच्या दारूचे बॉक्स घेऊन ही गाडी नाशिक येथून लातूरला निघाली होती. ती केजमार्गे जात असताना सारुळ पाटीजवळ ते पिंपळगाव या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकची ताडपत्री फाडली आणि आतमधून दारूचे बॉक्स चोरून नेले. सदरची घटना काल सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी ट्रक चालक राजेंद्र देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.