आष्टीच्या चोभानिमगावात घटना
भवरवाडीच्या जाँबाज तरुणांनी तिघा दरोडेखोरांना पकडले
आष्टी (रिपोर्टर): चोर, दरोडेखोरांच्या दहशतीपोटी गावागावात तरुणांच्या गस्त असताना पहाटेच्या दरम्यान आष्टी तालुक्यातल्या चोभानिमगाव येथे दरोडेखोर आणि झगडे कुटुंबियात चकमक झाली, दरोडेखोरांनी अंधाधूंद दगडफेक केली तर झगडे कुटुंबियातील व्यक्तीकडून त्यांच्याकहील रायफलमधून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले. गोळीबार होत असल्याने चोरटे घयनास्थळावरून पसार होऊ लागले. मात्र चोभानिमगाव जवळील भवरवाडीचे तरुण गस्त घालीत होते. त्यांना या घटनेची माहिती मिळाली तशी तेथील तरुणांनी पाठलाग करत तीन दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या खळबळजनक आणि धक्कादायक घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आष्टी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी श्वानपथकासह अन्य एक्स्पर्ट टीमला पाचारण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे.
आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील सतीश प्रभाजी झगडे यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्लाबोल केला. आलेल्या सहा दरोडेखोरांनी झगडे यांच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा तुटत नसल्याने त्यावर मोठमोठे दगडे मारले. झगडे कुटुंब झोपेतून जागे झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबातील एकाने त्यांच्याकडे अधिकृत रायफलमधून हवेत गोळीबार केला. तसा दरोडेखोरांनी झगडे कुटुंबियाच्या घरावर अंधाधूंद दगडफेक केली मात्र कुटुंबियांकडे रायफल आहे आणि त्यातून ते फायर करत आहेत, इथे आपला निभाव लागू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर दरोडेखोर तेथून पसार होऊ लागले. चोरी आणि दरोड्याच्या भीतीने गावागावामध्ये सध्या गावकर्यांच्या वतीने गस्त चालू आहेत. लोकं रात्ररात्र जागून काढत आहेत. चोभानिमगाव शेजारच्या भवरवाडी येथील काही तरुण गस्तीवर होते. त्यांना या घटनेची महिती झाली होती. पसार होत असलेल्या दरोडेखोरांना या तरुणांनी पाठलाग करून पकडले. तरुणांच्या हाती तीन दरोडेखोर लागले. त्यांच्या मुसक्या बांधत त्या तीन दरोडेखोरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांमध्ये रोहीत शंकर मोरे (वय 19 वर्षे), किरण गुलाब मोरे (वय 21 वर्षे) रा. राक्षसभवाडी ता. कर्जत, अजय सुखदेव शिंदे (वय 22 वर्षे, रा. कवडगाव जि. अहमदनगर), अक्षय पवार, विशाल बरडे (दोघे रा. कोपर्डी ता. जि. अहमदनगर), गुलाब मोरे (रा. चांदवड ता. श्रीगोंदा) यांचा समावेश आहे. पकहलेल्या दरोडेखोरांकडून लोखंडी गज, कोयता, करवत, गिलवन यासारखे धारदार हत्यार हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी सतीश प्रभाजी झगडे यांनी आष्टी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या दरोडेखोरांविरोधात गु.र.नं. 338/24 कलम 312, बी.एन.एस. 2023 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाला वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी भेटी दिल्या. श्वासन पथकासह अन्य एक्स्पर्ट टीमला घटनास्थळावर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस नाईक हनुमंत बांगर हे करत आहेत.
सतीश झगडे म्हणाले,
रात्री एक वाजण्याच्या सुमारास एक स्कॉर्पिओ आणि दोन मोटारसायकल आमच्या गावात आल्या. त्यांनी सर्वप्रथम विजपुरवठा करणार्या डीपीतून विदद्युतपुवरठा खंडीत केला. ड्रोनने गावातील काही घरांची रेकी केली. त्यामध्ये आमच्याही घराचा समावेश होता. ते आमच्या घराजवळ आले तेव्हा कुत्रे त्यांच्यावर भूंकू लागले. त्यावेळी गुलेरीतून कुत्र्यांवर दगडांचा मारा करण्यात आला. त्यावेळी सतीश झगडे झोपेतून जागे झाले, गच्चीवर जावून त्यांनी बाहेर पाहिले तर सहा ते सात दरोडेखोर त्यांना दिसून आले तेव्हा त्यांनी स्वत:च्या रायफलमधून हवेत गोळीबार केला. त्यावेळी दरोडेखोरांनी बंगल्यावर दगडांचा अंधाधूंद मारा सुरू ठेवला. त्यावेळी झगडे न भिता त्यांचा मुलगा व भाच्चा हे घराच्या कंपाऊंडमध्ये आले आणि त्यांनी चोरट्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. झगडे कुटुंबिय मागे हटण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही घटनास्थळावर तात्काळ पोहचले.