कडा (रिपोर्टर): अंमळनेर,आष्टी पोलिस ठाणे हद्दीत एकाच दिवशी दोन दरोड्याच्या घटना घडल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा क्शन मोडवर आली होती. पण कसलाच सुगावा लागत नव्हता. मात्र, एका ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर आल्या पावली परत निघालेल्या तीन दरोडेखोरांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून दोन दरोड्याच्या घटनांचे धागेदोरे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आष्टी तालुक्यातील किन्ही येथील काकडेवस्तीवर 21 जुलै रोजी पहाटे दीडवाजेच्या सुमारास बंद घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत बाप लेकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून 88 हजार रुपयाच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. याचा तपास सुरू असतानाच केरूळ येथील भागवत वस्तीवर 30 जुलै रोजी पहाटे दीड वाजेच्या दरम्यान अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी बाहेर झोपलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. आरडाओरड ऐकून घरात झोपलेल्या राजू भागवत बाहेर येताच त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करत पावणेदोन लाख रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. दोन्ही प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी पोलीस दरोडेखोरांच्या मागावर होते.पण कसलाच मागमूस लागत नव्हता.
दरम्यान, शुक्रवारी (दि.16) पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील सतीश झगडे यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रसंगावधान राखून झगडे यांनी हवेत गोळीबार केल्याने आल्या पावली माघारी फिरत दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले. मात्र, यातील तिघांना गस्तीवरील ग्रामस्थांनी पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून अंमळनेर, आष्टी येथील दरोड्याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.