बीड (रिपोर्टर) बीडच्या गावखेड्यातील धाव पट्टू अविनाश साबळे यांनी पुन्हा एकदा अटकेपार झेंडा फडकवला आहे. अविनाश साबळे आणि मुरली श्रीशंकर या भारतीय स्टार खेळाडूंनी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली आहे. अविनाशच्या या यशाने बीड जिल्ह्याचे नाव यशोशिखरावर जावून पोहचले असून अंतिम फेरीत अविनाश यशस्वी व्हावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक खेळप्रेमींनी देवाला साकडे घातले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावातील धावपटू अविनाश साबळे याने आपल्या गावचेच नव्हे तर जिल्ह्याचे, राज्याचे आणि आता देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर अलौकिक केले आहे. अविनाशला मध्यंतरी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळेल की नाही, हा विश्वास त्यालाही नव्हता. मात्र शिक्षकांसह अन्य हितचिंतकांनी त्याला प्रोत्साहीत केले आणि आज अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये अविनाशने अंतिम फेरी गाठली.
अविनाश 3,000 मीटर स्टीपलचेजच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याने त्याच्या हीटमध्ये 8 मिनिटे 18.75 सेकंद वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. या 27 वर्षीय खेळाडूच्या नावावरही राष्ट्रीय विक्रम आहे. जूनमध्येच त्याने डायमंड लीगमध्ये 8 मिनिटे 12.48 सेकंद अशी वेळ नोंदवून विक्रम केला होता.श्रीशंकरने त्याचवेळी पुरुषांच्या लांब उडीत अंतिम फेरी गाठली आहे. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 20 किमी शर्यतीच्या चालण्याच्या अंतिम फेरीत 34 वे स्थान पटकावले, तर संदीप कुमार पुरुषांच्या 40 व्या स्थानावर राहिला. अविनाश व्यतिरिक्त नीरज चोप्रा देखील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची सर्वात मोठी आशा आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरजही यावेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात नीरजने स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर फेक करून राष्ट्रीय विक्रम मोडला.