गणेश सावंत –
भुगोलाच्या जंगम मालमत्तेबरोबर इतिहासाची श्रीमंती असलेल्या महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा जातीची विषवल्ली लावली जातेय. धर्माची अफू पेरत धर्मांधतेची नशा केली जाते. निवडणुका आल्या की, जातीचे भंवर तयार केले जातात. धर्माच्या धुरामध्ये क्लेष तयार केले जातात आणि आम्ही त्या नशाखोर धर्मांध व्यक्तींच्या नादी लागत जातीवर आणि धर्मावर जात अभिमानी, धर्म अभिमानी म्हणत नाचत सुटतो तेव्हा कोणीही ‘ना हिंदू बनेंगा ना मुसलमान बनेंगा इन्सान की औलाद है तू इन्सान बनेंगा’ त्या माणूस धर्माची आठवणही करत नाही. धर्मांधतेच्या नशेत असणार्या प्रत्येक व्यक्तीने थोडसं आत्मकेंद्रित होत आपले शेजारी-पाजारी लक्षात आणले, आपले मित्र लक्षात आणले, आपल्याला कधीकाळी मदत करणारा व्यक्ती एकदा लक्षात आणला किंवा आपण कोणाला मदत केली हे लक्षात आणले तर मी या धर्माचा मी त्या धर्माचा यापेक्षा तेव्हा तो माणूस धर्माचा होता हे लगेच स्पष्ट होईल. परंतु ती धर्मांधतेची नशाच इतकी बेभान असते आणि त्या धर्मांधांनी ते धार्मिक जहर एवढ्या प्रमाणात दिलेलं असतं की त्याला स्वत:च्या धर्माची शिकवणही आठवत नाही. दुर्दैव याचं जिथं प्रत्येक धर्माचा आदर झाला त्याच महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा
जातीची विषवल्ली
घेऊन जाणारे गगनगिरी
इथेच निपजतात. खरंतर महाराष्ट्र निधडा आहे, राकट आहे, रांगडा आहे, बलवान आहे, शत्रुशी दोन हात करत विजयी पताका फडकवणारा आहे. या महाराष्ट्रात रक्ताचा घाम ओकत काळ्या आईच्या छाताडातून सोनं पैदा करणारा शेतकरी इथलाच आहे. इथे कष्ट आहे, इथे श्रम आहे, इथे इमान आहे, हा महाराष्ट्र निर्भय आहे, परंतु तितकाच बेभानही आहे. कोण कुठला एखादा धर्मांध उठतो अन् स्वधर्माच्या गर्वावर परधर्माच्या इज्जतीला हात घालतो अन् आम्ही सारे त्याकडे उघड्या डोळ्याने पाहतो. होय, स्वधर्माचा गर्व प्रत्येकाला असायला हवा, परंतु परधर्मावर गरळ ओकणे ही हिंदू धर्माची अथवा कुठल्याच धर्माची शिकवण नाही. महाराष्ट्रात तर या गोष्टी व्हायलाच नकोत. कारण इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसह नामदेव चोखा बंका, जनाई-सिताई सारखे संत जन्मले. त्यांचे चरित्र वाचा, त्यांचे अभंग वाचा, अहो, जाऊ द्या संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचा, तुकोबांची गाथा वाचा, त्यामध्ये ‘खरा तो एकची धर्म कुठला’ यावर उत्तर मिळेल. परंतु ते आम्हाला वाचायचे नाही, स्वत:च्या धर्माची शिकवण माहीत नाही आणि केवळ हेतुपुरस्सर, जाणीवपुर्वक महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्म यात तेढ कसा होईल, असे वक्तव्ये काहींकडून केले जातात. हे दुर्दैव!
संत वचन काय
हे तथाकथीत भोंदूंनी खरंतर लक्षात घेतले पाहिजे. जगद्गुरू संत तुकोबांनी सर्वप्रथम स्वत:कडे कठोरतेने पाहिले. त्याचबरोबर जनरितीची कठोर परिक्षणे केली आणि त्यावर आवश्यक त्या ठिकाणी अत्यंत निर्भिडपणे त्यांनी सत्य प्रतिपादीत केले. तुकोबांचा उपदेश भावूक नव्हता, प्रत्येकाला खर्या धर्माच्या पालनाकडे कसे जायचे? हा दिशा देणारा होता. ईश्वराचे नाम:स्मरण करण्याबरोबर ईश्वराकडे पाहताना तुकोबा ‘माय-बापाहून बहू मायावंत करू घातपात शत्रुहुनी, भले तरी देव काशीची लंगोटी, नाथाडाच्या माथी हाणू काठी’ या वैशिष्ट्यपूर्ण अभंगातून त्यांच्या भूमिका अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत. तुकोबांचे विठ्ठलासोबतचे नाते ईश्वरा सोबतचे नाते, परमात्म्याकडे जिव्हाळ्याने पाहताना तुकोबा धर्म विसरले नाहीत, पण तो धर्म कुठला? तो धर्म माणुसकीचा. तुकोबांच्या इतक्या जवळ देव होता ते त्याच्याशी भांडतात, हक्काने सांगतात आणि हक्काने रुसतातही. परंतु तुकोबापासून ज्ञानोबा, जनाईपर्यंत कोणीही परधर्माबद्दल अथवा परधर्माच्या परमेश्वराबद्दल अपशब्द वापरल्याचे ज्ञात नाही. तुकोबांचे देवाशी असलेले सख्ख्य विश्वासाच्या खूप पलिकडचे होते. म्हणूनच या नात्यावर ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगती’, अशा शब्दात देव चराचरात आहे आणि तो माझ्या सोबत आहे, हा देव नव्हे संकुचीत कारण तो नाम्यासेवी जेवी, म्हणजे नामदेवासोबत तू जेवला, तुकोबा पुढे जात म्हणतात, यातायाती नाही धर्म विष्णूदास, निर्णय असा वेदशास्त्री’ वेदशास्त्राचा हवाला देऊन तुकोबा निश्चयाने म्हणतात या वैष्णव धर्मात जातीचा विचार अगदीच गैर लागू आहे. त्यासाठी ते म्हणतात, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ चोखा मेळा बंका असा जातीचा महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी’ तुकोबांचा हा विश्वास भगवद् गितेतील स्त्रियो वैश्या: तथा शुद्रा; तहेरपि यान्ति परांगतिम्या भगवद् वचनांचा साक्षात अनुवाद ते देतात. अंत्यजाती योनि तरल्या हरी भजने असा निर्वाळा देत ते म्हणतात, वर्णअभिमाने कोण झाले पावन, पोकळ अभिमानाने कोणी अधिक सोहळा किंवा पावन ठरत नाहीत, एकदा तुम्ही हरीचे दास झालात की मग पवित्र ते कुळ पावन तो देश असेच तुम्ही गणले जाता. असे तुकोबांनी स्पष्ट सांगितले. मात्र त्याच संताच्या महाराष्ट्रात आज ज्या पद्धतीने
धार्मिक द्वेष
पसरवण्याचा धंदा संत म्हणणारे उभारीत असतील, तर तो संतांचा अपमान म्हणावा. इतिहास, पुराण, अध्यात्म याकडे पाहताना अथवा त्याचे उदाहरण देताना आम्ही किती श्रेष्ठ आणि दुसरे किती मलिन हे जो दाखवण्याचा उद्योग आहे ना, तो उद्योग कुठल्याही धर्मासाठी समर्थनीय नाही. खरंतर पुराण, अध्यात्म हे ऐतिहासिक तथ्य म्हणून घ्यायला नको. पौराणिक आणि अध्यात्मीक कथा, मूल्य आणि शहानपण शिकवण्यासाठी असतात आणि त्याकडे तसेच पहायला पाहिजे. परंतु इथं उलटं होतं, कोणी कितव्या वर्षी लग्न केलं, त्याची भार्या किती वर्षाची होती, यावर भाष्य केलं जातं. तसं पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत इथं अल्पवयीन असताना विवाह केले जायचे. इथे सतीची प्रथा होती, रामायण, महाभारत, पुराण, वेद यामध्ये डोकावून पाहिलं तर अनेक देव-देवतांचे लग्न हे अल्पवयीन म्हणण्यापेक्षा दहा वर्षाच्या आतील मुलींशी झालेले आहेत. अन्य धर्माचे प्रेषित, प्रमुख यांच्याविषयी भाष्य करताना ढोंगीपणातल्या व्यक्तींनी तेही पहायला नको का? परंतु हे विषय बाहेर काढणे मुळात या लोकांना धर्माबद्दल प्रेम नाही, या लोकांना माणसांबद्दल प्रेम नाही,
धर्म आणि जात
केवळ सत्ताकारणासाठी
आता वापरली जातेय. कर्तृत्व, कर्मातून स्वराज्य उभा करता येतं. निधड्या छात्या आणि सळसळत्या मनगटातून इथं शत्रुचा नितपात केला. अन्यायी-आसुरी राज्य उलथवून स्वराज्य ते सुराज्य या महाराष्ट्रात निर्माण झाले. ते निर्माण करताना छत्रपतींनी कधी जात पाहिली नाही, कधी धर्म पाहिला नाही, रयतेवर अन्याय करणारा, अत्याचार करणारा हा स्वराज्याचा दुश्मन समजून त्याचा नायनाट केला. रयतेच्या भाजीच्या देठाला हात न लावण्याचा सज्जड दम आपल्या कर्तबगार कर्मचार्यांना म्हणजे मावळ्यांना छत्रपतींनी दिला. त्याच महाराष्ट्रात आता कर्तृत्व-कर्मावर काही करता येत नाही. राज्य हाकताना रयतेचं देणंघेणं नाही. त्यांच्या मुलभूत गरजांकडे पाहणं नाही, मात्र जेव्हा निवडणुका येतात तेव्हा जातीच्या बुजगावण्याच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या, धर्माच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या आणि त्यावर जात आणि धर्माचं ध्रुवीकरण करत मताचा विजयाचा टक्का आपल्या पदरात पाडून घ्यायचा आणि पुन्हा सत्ताकारणाच्या शेजेवर निजायचे. हे धोरण आजकालच्या सत्ताधार्यांचे नव्हे नव्हे तर विरोधकांचेही. यातून जो जातीय आणि धार्मिक द्वेष, क्लेष निर्माण होतो तो माणूस धर्माला हानी करणारा. आम्ही तर म्हणू जातीची विषवल्ली इथेच नव्हे तर गगनावरीही कोणी घेऊन जात असेल तर त्याचा प्रखर विरोध करा. स्वत:च्या धर्माचा आदर करण्याबरोबर परधर्माचा आदर करण्यास शिका, इतिहासाचे, अध्यात्माचे आणि वेदांचे दाखले कर्म-कर्तृत्व-कर्तव्य सत्यासाठी वापरा.