अंतरवली सराटी/बीड (रिपोर्टर): सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे धाकटे बंधू अशोक मुंढे यांनी आज अंतरवली सराटीत जावून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या भेटीला अनन्यसाधारण महत्व एवढ्यासाठीच येत आहे की अशोक मुंढे हे बीड तालुक्यातल्या आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या ताडसोन्ना या गावचे रहिवासी आहेत आणि ते गेवराई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असल्याची चर्चा आहे. त्यात अशोक मुंडेंनी आता जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बीड तालुक्यातील अन् गेवराई मतदारसंघातील ताडसोन्ना येथील सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे धाकटे बंधू अशोक मुंढे हेही प्रशासकीय सेवेमध्ये क्लासवन अधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी ते निवृत्त झाले. आता अशोक मुंढे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत आले आहेत. गेवराई मतदारसंघात त्यांचे गाव असून बीड जिल्ह्यातला प्रत्येक मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे, त्यात जिल्हा मराठा-ओबीसी हा वाद पहायला मिळतो. अशा स्थितीत अशोक मुंढे यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेतली. जरांगे यांनी आपण कुठलेही उमेदवार देऊ मग ते ओबीसीही असू शकतात, असे या आधी म्हटले होते. त्यामुळे या भेटीकडे अधिक गांभीर्याने पाहितले जाते. अशोक मुंढे यांनी जरांगेंची भेट घेत बंद दाराआड तब्बल 20 मिनिटे चर्चा केल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर माध्यमांनी त्यांना याबाबत विचारले परंतु त्यांनी ‘नो कॉमेंटस्’ म्हणून उत्तर दिल्याचे सांगण्यात येते. अशोक मुंढे हे निवडणूक लढवण्याबाबत इच्छूक असल्याचेही बोलले जात असल्याने आणि आज जरांगे यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.