बीड (रिपोर्टर): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक, केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे एक पद भरण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बीड जिल्ह्यात 2473 शाळा आहेत. या प्रत्येक शाळेवर एक प्रशिक्षणार्थी शिक्षक याअनुषंगाने बीड जिल्ह्यात जवळपास अडीच हजार शिक्षकांची निवड केली जाणार आहे. या शिक्षकांना 6 हजार ते 10 हजार दरम्यान मासिक पगार मानधन मिळणार आहे.
राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेपाठोपाठ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून किमान सहा महिने प्रत्येक शासकीय कार्यालयात आणि शाळांमध्ये या युवकांना तात्पुरती नोकरी देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्याअनुषंगाने काल शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला आदेश काढत त्यांच्या शाळेमध्ये एक प्रशिक्षणार्थी शिक्षकाची निवड करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने दि. 27 पर्यंत या शिक्षकाची निवड करून तसा अहवाल गटशिक्षणाधिकार्यांमार्फत शिक्षणाधिकार्यांना द्यावयाचा आहे. स्थानीक पातळीवर गावातील रहिवासी किमान 12 वी पास ते पदव्यूत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणार्या उमेदवाराला नियुक्ती द्यावयाची आहे. एकापेक्षा जास्त अर्ज आले तर संबंधित मुख्याध्यापकाने व्हिडिओ शुटींग करत लॉटरी पद्धतीने ही निवड करावयाची आहे. या प्रक्रियेला शुक्रवारपासून वेग आला असून आजपर्यंत दीड हजार जणांना या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.