परभणी -ऑनलाईन रिपोर्टर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्र विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. केजरीवालांच्या आपकडून आज (दि.25) तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही आप उमेदवार लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार जाहीर
विधानसभा महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांबरोबरच आता आम आदमी पार्टीने विधानसभेसाठी कंबर कसलीये. मराठवाड्यातील तीन जागा आम आदमी पार्टीने जाहीर केल्यात बीड, लातूर पाठोपाठ परभणी विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटकांकडून जाहीर करण्यात आलाय. परभणीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात जरी आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स बरोबर असली तरी महाराष्ट्रात मात्र ते विधानसभेच्या 288 जागा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालंय.
मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम्ही केली : प्रीती शर्मा
काही दिवसांपूर्वी आप नेत्या प्रीती शर्मा यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आम्ही विधानसभा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. प्रीती शर्मा म्हणाल्या होत्या की, आगामी विधानसभा निवडणुका आम्ही आम आदमी पार्टी एकट्याने लढायच्या तयारीत आहोत. आम आदमी पार्टी या शतकातील सर्वात यशस्वी राजकीय पक्ष आहे. फक्त 2012 मध्ये स्थापन झालेल्या राजकीय पक्षाने आतापर्यंत दोन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. मुंबईतील 36 जागा लढण्याची तयारी आम्ही केली आहे.