बीड (रिपोर्टर): ऋण काढून सण साजरा करता येत नसतो. महाराष्ट्राचं भरभक्कम उत्पन्न आहे. त्या उत्पन्नातूनच कष्ट करणार्या, राबराब राबणार्या माझ्या माता-भगिनींना मी ओवाळणी देत आहे. हा अजितदादाचा वादा आहे. मी बहिणींना फसवणार नाही, ओवाळणी कोणी वापस घेत असतं का? विरोधकांना काही करायचं नाही आणि आम्ही काही करतोत तर त्यात अडचणी आणायच्या. आमच्यावर खोटे आरोप करायचे, परंतु भगिनींनो काळजी करू नका, हा तुमचा भाऊ खंबीर आहे. आमच्या सरकारला सेवेची पुन्हा संधी द्या, पाच वर्षे या सर्व योजना चालू राहतील. महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा तिथे माफी नाही, मग तो श्रीमंताचा मुलगा आहे, पुढार्याचा मुलगा आहे की सत्ताधार्याचा मुलगा आहे अथवा अन्य कोणी आहे त्याला सोडणार नाही. महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असेल आणि बलात्कार्याला फाशीसारखीच शिक्षा असेल, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
ते बीड येथे आयोजीत जनसन्मान यात्रा प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, आ. विक्रम काळे, रुपालीताई चाकणकर, माजी आ. जनार्दन तुपे, अमरसिंह पंडित, अशोक डक, जयसिंह सोळंके, राजेश्वर चव्हाण, योगेश क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, बबन गवते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला आमच्या पक्षाची आणि महायुतीची भूमिका सांगत आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, भगिनी, युवतींसाठी आणि तरुणांसाठी आम्ही काय केलं, आम्ही काय करणार याची माहिती देण्यासाठी ही जनसन्मान यात्रा आहे.
खेळाच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधीत्व करणारा बीडचा अविनाश साबळे याचे खास अभिनंदन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या वेळी केले. पुढे ते म्हणाले, विरोधक सोन्याचा चमचा घेऊन आलेत, त्यामुळे गोरगरिबांचे दु:ख आणि हाल त्यांना काय कळणार? मी दहा अर्थसंकल्प मांडले. नऊ अर्थसंकल्पांचा मला अनुभव आहे. ऋण काढून सण साजरे करता येत नसतात, पैशाचे नाटकं करता येत नसतात. महाराष्ट्राची भरभक्कम आर्थिकस्थिती आहे, म्हणून या योजना आहेत. माझ्या मायमावल्या राबराब राबतायत , त्यांना काहीतरी द्यायचं ही माझी इच्छा होती म्हणून ही ‘माझी लाडली बहीण’ योजना काढली. विरोधक याला विरोध करतात, जुमला आहे, असे म्हणतात, परंतु हा अजितदादा आहे शब्दाला पक्का आहे आणि हा अजितदादाचा वादा आहे. आमचं सरकार येऊ द्या, पाच वर्ष ही योजना चालू ठेवणारच. भाऊ कधी ओवाळणी वापस घेत नसतो, असेही अजित पवारांनी या वेळी सांगितले. शेतकर्यांना वीज मोफत देत आहे, 52 लाख कुटुंबियांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे, गोरगरिबांच्या मुलींचंं महाविद्यालयीन शिक्षण मोफत असणार आहे. काय यात आमचं काय चुकलं, विरोधक आमची टिंग टवाळी करतायत, त्यांना काही करायचं नाही आणि आम्ही करतोत तर त्यात खोडा घालायचाय. मी विरोधकांवर काही बोलत नसतो, माझ्याकडे भरपूर काम आहे, आता लाडली बहीण योजनेत ज्या बहिणीला पैसे मिळाले नाहीत त्यांना नागपूरच्या कार्यक्रमादिवशी त्यांच्या खात्यावर पैसे देणार असल्याचे दादा म्हणाले. काँग्रेसच्या काळात सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात मोफत वीज दिली आणि निवडणुका झाल्या की ती रद्द करून टाकण्यात आली हे माझ्याकडे होणार नाही, आमचे सरकार असू द्या, सगळ्या योजना चालू राहतील. सर्व जात-पात-धर्म पंथांसाठी सारथी आधारीत मार्टी, बार्टी, आर्टी अशा योजना काढल्या. त्यातून युवकांना शिक्षण-प्रशिक्षण देण्यात येत आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, महिलांवरील अत्याचार खपवून गेतला जाणार नाही, तो अक्षम्य गुन्हा आहे. तिथे माफी नाहीच, कुणाचाही पोरगा असो, महिलांवर अत्याचार करणार्याला हा दादा सोडणार नाही, महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, बलात्कार्याला फाशी अशी रोखठोक भूमिका अजितदादांनी मांडत शाळा, रुग्णालय, महाविद्यालये, पोलीस ठाण्यात हयगय खपवून घेतली जाणार नाही, महिलांना ई तक्रारी करता येणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जी काही घटना घडली ती चूक ती चूकच. चुकीला अजिबात माफी नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. संविधान बदलाच्या चुकीच्या प्रचारामुळे आम्हाला लोकसभेत फटका बसला, भारताचं संविधान हे जगात सर्वोच्च आहे, तिथे कुणीही हात घालणार नाही, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही सर्व जात-पात-धर्म-पंथाला सोबत घेऊन या महाराष्ट्राला नंबर एकवर नेणार आहोत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला साथ द्या, असे आवाहन अजितदादांनी केले.