मुंबई/बीड (रिपोर्टर): गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेले असताना सणासुदीच्या दिवसात महाराष्ट्रात एसटीची सेवा पुर्णत: विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळत असून एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबीत मागण्यांसाठी आजपासून संपाबरोबर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत विविध आगारात कामबंद आंदोलन पुकारल्याने बससेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. राज्यात जी स्थिती आहे तीच स्थिती बीड जिल्ह्यात पहावयास मिळत असून आज सकाळपासून बीड बसस्थानकातून एकही बस बाहेर निघाली नाही. कर्मचार्यांनी सकाळीच कामबंद आंदोलन करत आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून बीड बसस्थानकात घोषणाबाजी केली.
राज्यातील सुमारे 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने हे आंदोलन पुकारले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून राज्यभरातल्या बहुतांशी आगारांमध्ये या संपाचे पडसाद उमटल्याचे दिसून येते. 35 आगार पुर्णत: बंद असून मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यातले बहुतांशी आगार शंभर टक्के संपात सहभागी आहेत. या बंदमुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या वेळेस आंदोलन झाले होते. या वेळी शासनाने कर्मचार्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र त्या आश्वासनांची पुर्णत: अदद्याप करण्यात आलेली नाही. या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संघटनेने आजचा हा बंद पुकारला आहे. इतर कर्मचार्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचार्यांना पगार देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे.