बीड (रिपोर्टर): कधी दुष्काळाने तर कधी अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळून शेतातले उभे पीक नेस्तनाबूत झाले. याची गंभीर दखल कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी घेत परळीसह गेवराई तालुक्यातल्या अनेक गावातील बांधावर जावून पाहणी केली. मात्र गेवराई तालुक्यातील कृषी अधिकारी, तलाठी इतके मुजोर आणि सुस्त असल्याचे दिसून येत असून, ईटकूर परिसरात ज्या पिकांची नासाडी झाली ती पीक पाहणी आणि पंचनामे करण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकार्यांना सांगूनही अधिकारी, तलाठी पंचनाम्यासाठी येत नसल्याने परिसरातील शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे.
गेवराई तालुक्यातील ईटकूर परिसरात दीडशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आणि या पावसात शेतातील उभे पीक उद्ध्वस्त झाले. हातातोंडाशी आलेल्याचे कापसाच्या झाडांची जागच्या जागी सडून राखरांगोळी झाली. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहून कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतीची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र गेवराई तालुक्यातील कृषी अधिकारी नव्हे नव्हे तर तलाठी आपल्याच मदमस्त धुंदीत असल्याचे पहावयास मिळते. शेतकर्यांनी अनेक वेळा तलाठी, कृषी अधिकारी यांना पंचनाम्यासाठी बोलावूनही ते पाहणी आणि पंचनाम्यासाठी येत नाहीत, टाळाटाळ करतात, कारणे दाखवतात. सदरचा प्रकार अत्यंत गंभीर आणि शेतकर्यांसाठी संतापजनक आहे. शेतकर्यांच्या हालअपेष्टा न पाहवणार्या असताना अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर अशा दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी द्यावेत आणि ईटकूर परिसरातील शेतकर्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.