अंबाजोगाई/बीड (रिपोर्टर): मुंबईत काढण्यात येणार्या तिरंगा रॅलीसाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईकडे रवाना होत असून बीड शहरातून आज दुपारनंतर ही तिरंगा रॅली औरंगाबादकडे रवाना होणार आहे. केज, धारूर, अंबाजोगाई, परळी, वडवणी येथील रॅलीत सहभागी होणारी वाहने बीडपासून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. तत्पूर्वी वाहनांची नोंदणी मोमीनपुरा भागातील इज्तेमा मैदान येथे सुरू झाली आहे.
मुंबई महानगरीमध्ये 23 सप्टेंबर रोजी सर्वधर्म तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आज दुपारी बीड शहरासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्याची जय्यत तयारी झाली असून बीड शहरातील मोमीनपुरा बायपास लगतच्या बिंदुसरा नदी पात्र मैदानात ही सर्व वाहने एकत्रित येत आहेत. त्या वाहनांची नोंदणी सध्या सुरू असून औरंगाबादकडे ही रॅली जाणार असल्याने परळी, अंबाजोगाई, वडवणी, धारूर, केज या भागातली वाहने बीडमध्ये येऊ लागले असून सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही रॅली मोमीनपुरा इज्तेमा मैदान येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस चौक, बशीरगंज, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे जालना रोड मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करणार आहे. औरंगाबाद येथे रॅलीमध्ये सहभागी होणार्या लोकांची राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली असून सोमवारी सकाळी सहा वाजता रॅलीसाठी जमलेले सर्वांचे नाश्ते झाल्यानंतर ही रॅली मुंबईकडे रवाना होणार आहे.