मध्यरात्री बर्दापूर पोलीस घटनास्थळी
चारही मयत लातूर जिल्ह्यातले
अंबाजोगाई (रिपोर्टर): लातूर येथून संभाजीनगरकडे निघालेली स्विफ्ट कंटेनरमध्ये घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई, लातूर रोडवरील नांदगाव पाटीजवळ घडली. जोरदार पाऊस सुरू असल्याने बहुदा स्विफ्ट चालकाला कंटेनर दिसले नसावे, भरधाव वेगात असलेली गाडी कंटेनरवर जाऊन आदळली आणि हा अपघात झाला. अपघातातील सर्व मयत हे चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील असल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती कळताच रात्री बर्दापूर पोलीस ठाण्याचे पीआय आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी डेरेदाखल झाले. रात्रीच सर्व मृतदेहांना अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या जगलपूर आत्माराम माधवराव बाणापुरे (वय 54 वर्षे, रा. जगलपूर ता. चाकूर), माधव व्यंकटराव खलंग्रे (वय 58 वर्षे), सौदागर केशव कांबळे (वय 50 वर्षे), शिवराज शंकरराव डोंब (वय 51 वर्षे व्यंकटेशनगर लातूर) हे सर्व स्विफ्ट क्र. एम.एच. 24 एएस 6334 मध्ये बसून छत्रपती संभाजीनगरला निघाले होते. रात्री लातूर, अंबाजोगाई परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई-लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांची कार आली, त्यावेळी समोरून कंटेनर क्र. एम.एच. 12 एमव्ही 7188 येत होता. भरधाव वेगातल्या स्विफ्टने जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता, अक्षरश: स्विफ्ट कारचा चुरा झाला. त्यात वरील चौघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाने, पीएसआय यादव, सह फौजदार बीडगर, पो.हे.कॉ. शेख सह अन्य कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील मृतदेह बाहेर काढत ते अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. मुसळधार पावसामुळे स्विफ्ट चालाला समोरून येणार्या वाहनाचा अंदाज आला नसावा. त्यात हा दुर्दैवी अपघात घडला असावा, असे सांगण्यात येते.