लोकसभा निवडणुकीत भाजपाने दोन वेळा निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना बाजूला करत पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. पण, आता प्रीतम मुंडे विधानसभा निवडणूक लढवणार की पक्ष संघटनेत काम करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रीतम मुंडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल पंकजा मुंडे यांनी भाष्य केले.
प्रीतम मुंडे विधानसभा निवडणूक लढणार आहे का आणि लढणार असतील कोणत्या मतदारसंघातून? या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, यावर कुठलंही भाष्य मी आत्ता करू शकत नाही. माझी भूमिका सगळ्यांना माहिती होती. माझ्यासाठी सोडावी लागलेली नाही. माझी घोषणा केल्यामुळे मला ती लढावी लागली, असे ते चित्र आहे. आमच्यामध्ये विषय चर्चेत नाही.
योग्य वेळी निर्णय घेऊ -पंकजा मुंडे
पक्ष जो निर्णय घेईल… आता युतीमध्ये मलाच जागा नाही, कुठली लढण्यासाठी; त्यामुळे मी विधान परिषदेवर आहे. जेव्हा असा विषय येईल… लढवायची गरज असेल, तेव्हा लढवू. जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल, तेव्हा संघटनेचं काम करू. पाच वर्ष मी देखील संघटनेचे काम केले आहे. आमच्या कुटुंबावर भाजपाचे पिढ्या न् पिढ्यांचे संस्कार आहेत. जो निर्णय घ्यावा लागेल, योग्य वेळी तो घेऊ, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांचा 6 हजार मतांनी झाला होता पराभव
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली होती. मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असलेल्या या मतदारसंघात पंकजा मुंडेंना पराभवाला सामारे जावे लागले.
ओबीसी समुदायातून येत असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाने विधान परिषदेवर पाठवले आहे. यातून भाजपाने परळी विधानसभा मतदारसंघात पेच सोडवला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे परळी मतदारसंघातून लढल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडे हे आता भाजपासोबत, महायुतीत आहेत.