तेलगाव (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 9 वा दिवस, त्यांची प्रकृती खालावत चालल्याने आता जिल्ह्याचा मराठा समाज रस्त्यावर दिसून येताना दिसून येत आहे. तेलगाव चौफाळ्यावर आज पंधरा ते वीस गावातील मराठ्यांनी रस्त्यावर येत भरपावसात तब्बल दोन ते अडीच तास रस्ता रोखून धरल्याने माजलगाव, धारूर, परळी आणि बीड या चारही रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली. आंदोलनकर्त्यांनी या वेळी मंत्री छगन भुजबळ, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या नावाच्या पाट्या श्वानाच्या गळ्यात अडकवल्या. या वेळी आंदोलकांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती प्रचंड खालावली असून काल महिलांनी आक्रोश करत उपचार घ्या, म्हणत टाहो फोडल्यानंतर रात्री उशीरा जरांगे यांना सलाईन लावण्यात आली. सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे आणि छगन भुजबळांच्या आदेशावरून लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे जातीय तेढ निर्माण करण्याहेतू अंतरवली सराटी रस्त्यावरच उपोषण करत आहेत. त्यामुळे मराठा समाज अधिक संतापला असून तो आता रस्त्यावर उतरताना दिसून येत आहे. तेलगाव चौफाळ्यावर परिसरातील पंधरा ते वीस गावातील मराठ्यांनी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरून रस्ता रोखून धरला. सकाळी दहा वाजता चौफाळ्यावर रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. या वेळी तुफान पाऊस सुरू होता. आंदोलक रस्त्यावरून हटले नाहीत. तब्बल दोन ते अडीच तास हा रस्ता रोको चालला. त्यामुळे बीड, माजलगाव, परळी आणि धारूर या चारही रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. या वेळी आंदोलकांनी श्वानाच्या गळ्यात भुजबळ, हाके अन् वाघमारे यांच्या नावाच्या पाट्या बांधल्या होत्या. सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी या वेळी करण्यात येत होती.