अंबाजोगाई (रिपोर्टर): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील मराठा बांधव बुधवारी सकाळी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेलूअंबा टोल नाक्यावर भर पावसात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे टोल नाक्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक खोळंबल्याने याचा फटका प्रवाशांना बसला आहे. मागील दहा दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे. सगे – सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी हे उपोषण सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबाजोगाईतील सेलूअंबा टोल नाक्यावर भर पावसात आज मराठा समाजाच्या तरुणांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
या आंदोलनात ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. आंदोलनस्थळी काही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.