इतर महिलांसाठी हे कार्य अनुकरणीय
बीड (रिपोर्टर):महायुती सरकारची मुक्यमंत्री लाडकी बहीण योजना एकीकडे चांगलीच चर्चेत आहे तर दुसरीकडे या योजनेतून मिळालेल्या पैशातून परळीतल्या नेहरू चौक तळभागात राहणार्या अक्षरा अक्षय शिंदे या महिलेने आर्टीफिशीयल वटवृक्ष झाडे तयार करून कृत्रीम वटवृक्ष या उद्योगाला सुरुवात केली. गौरी गणपती उत्सवात या महिलेने 12 हजार रुपये कमवले. तिच्या या उपक्रमाचे कौतुक करत राज्याचे कृषीमंत्री ना. धनंजय मुंडेंनी दीड हजारात काय मिळतं? म्हणणार्यांच्या डोळ्यात अक्षराताईंनी झणझणीत अंजन घातल्याचे सांगत अक्षराताई तुझे अभिनंदन, म्हणत इतर लाडक्या बहिणींनीही याचे अनुकरण करावे, असे एक्सवर म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सध्या बहुचर्चित आहे. सत्ताधारी या योजनेतून महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल असे म्हणत आहे तर विरोधक या योजनेकडे मत वळवण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचे सांगत आहेत. काहीजण दीड हजारात काय होते? असं म्हणत योजनेला हिणवतही आहेत. आज राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचे आणि योजनेतील दीड हजार रुपयांचे महत्व याची डोळी याची देह पटवून दिले. परळीतील नेहरू चौक तळभागात राहणार्या सौ. अक्षराताई अक्षय शिंदे या भगीनीने तीन महिन्यांच्या कालखंडात जे साडेचार हजार रुपये मिळाले त्यातून सजावटीसाठी कृत्रीम वृक्ष बनवण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला. गौरी गणपतीच्या सणात आठवडाभरातच त्यांनी त्यातून 12 हजार रुपये कमवले. यावर मुंडेंनी आज एक्सवर अक्षरा यांचे कौतुक करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला हिनवणार्यांच्या डोल्यात अक्षराताईने झणझणीत अंजण घातले. दीड हजारात काय मिळते, हा जो प्रश्न उपस्थित करणार्यांना दीड हजारात महिला काय करू शकतात हे अक्षराताईने दाखवून दिले. अक्षराताई तुझे अभिनंदन म्हणत अक्षराताईचा हा उपक्रम इतरही लाडक्या बहिणींसाठी अनुकरणीय असल्याचे मुंडेंनी म्हटले.