माजलगाव (रिपोर्टर): माझ्याकडे सध्या साधी पिठाची गिरणी नाही, परंतु, तुमच्या सारख्या निष्ठावंत माणसांची माझ्या तना-मनात एफडी आहे. ती तोडून मी केव्हाही निवडणुकांमध्ये एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. जिल्ह्यात एकच घर आहे, मात्र तुमच्या बळावर 1980 साली जे झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा इथे करेल. शरद पवार आणि अजित पवार यांच्या आशीर्वादानेच अपाण माजलगावचा झेंडा मुंबईत रोवल्याचे स्पष्ट करत मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी प्रकाश सोळंकेंना घरचा आहेर दिला.
मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी आज मित्र परिवाराचा एक मेळावा माजलगावातील राजस्थानी मंगल कार्यालयात घेतला. या मेळाव्याला डक समर्थकांनी मोठी उपस्थिती दर्शविली. या वेळी बोलताना अशोक डक म्हणाले की, मी निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा आहे, तुम्हाला आवडेल असाच निर्णय घेणार आहे. तुमच्या बळावर आणि पक्षाच्या बळावर आजपर्यंत मी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो, माजलगाव बाजार समितीचा सभापती झालो, शरद पवार आणि अजित पवारांच्या नेतृत्वात मी माजलगावचा झेंडा थेट मुंबईत फडकवू शकलो, आज माझ्याकडे साधी पिठाची गिरणी नाही, परंतु तुमच्यासारख्या निष्ठावान माणसांची एफडी माझ्या तनामनात आहे. तुमच्या बळावर मी कुणाचाही आणि कुठेही करेक्ट कार्यक्रम करू शकतो अणि 1980 ची पुनरावृत्ती घडवून आणू शकतो, असा गर्भित इशारा अशोक डकांनी या वेळी दिला. 1980 साली सुंदरराव सोळंकेंचा पराभव अशोक डक यांचे वडील गोविंदराव डक यांनी केला होता. त्यामुळे अशोक डकांच्या आजच्या भाषणाची आणि त्या भाषणातील रोखाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.