एकदा पंप घेतल्यास 25 वर्षे सिंचनाचे साधन उपलब्ध होते
बीड, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची घोषणा केली. हे पंप अनुदानावर मिळत आहेत. पंपासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आले होते. 27 सप्टेंबर पर्यंत बीड जिल्ह्यातील 24 हजार 526 शेतकर्यांनी अर्ज दाखल केले आहेत. या शेतकर्यांना येत्या काही महिन्यामध्ये हे पंप मिळणार आहेत.
सौर कृषी पंप वापरामुळे विजेची बचत होवू लागली. जास्ती जास्त शेतकर्यांनी सौर पंप वापरावे आणि विजेवरचा भार कमी करावा अशी योजना आखली आहे. सौर पंप विज वितरण कंपनीकडून दिले जातात. अनुसुचित जाती जमातीच्या शेतकर्यांसाठी 5 टक्के रक्कम संबंधित शेतकर्यांना भरावी लागते. उर्वरीत रक्कम वित वितरण कंपनी देत आहे. येत्या हंगामाच्या काळात शेतकर्यांना सौर पंप उपलब्ध व्हावेत म्हणुन वितरण कंपनीने शेतकर्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला उदंड प्रतिसाद मिळाला. 27 सप्टेंंबरपर्यंत बीड जिल्ह्यातील 24 हजार 526 शेतकर्यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने सौर कृषी पंप दिले जात आहेत. सौर ऊर्जा निर्मिती पॅनलमधून 25 वर्षे विज निर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की शेतकर्याला 25 वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन उपलब्ध होत आहेत.