आता थांबणार नाही, जनतेच्या दरबारात जावून निवडणूक लढवणार
माजलगावात भाजपासह सत्ताधारी आमदाराविरोधात मोहन जगताप कडाडले
माजलगाव (रिपोर्टर): गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी लॉबिंग केली, ब्लॅकमेलिंदग केली आणि माझा राजकीय गेम केला. आता राजकारण फसवं झालं. गेल्या वेळेस पंकजाताई म्हणाल्या होत्या, माझं तिकीट धोक्यात आहे, म्हणून मी माघार घेतली. सातत्याने माझा राजकीय गेम केला जातोय, आता नाही. मी विधानसभा निवडणूक लढवणार, मग कुठल्या पक्षाकडून हे वेळ आल्यावर सांगेन. परंतु मी जनतेच्या दारात जावून तुमच्या जिवावर उभा राहील. तुम्हीच ठरवा तुम्हाला टक्केवारीचा आमदार पाहिजे की, माझ्यासारखा आमदार, असे म्हणत मोहन जगतापांनी भाजपासह मतदारसंघाच्या बाहेरून इच्छुक असणार्यांवर आगपाखड केली तर विद्यमान आमदार प्रकाश सोळंकेंचे आपल्या भाषणातून वाभाडे काढले.
मोहन जगताप यांनी आज माजलगावमध्ये शक्तीप्रदर्शन केले. माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील समर्थक या शक्ती प्रदर्शनाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या निवडणुकीपासून ते आजपर्यंतचा इतिहास सांगितला. बाजीराव जगताप यांनी शिवसेनेतून पराभूत झाल्यानंतर तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक कशी लढवली आणि विजयी झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांची भेट कशी घेतली? त्यावेळेस काय झाले हे सांगत तेव्हापासून आतापर्यंत आपल्यावर कसा अन्याय केला जातोय, पक्ष बदलल्यानंतर आपण ज्या पक्षात, त्या पक्षात आमदार कसा येतो, हे विस्तृत सांगत गेल्या निवडणुकीमध्ये आपला राजकीय गेम झाल्याचे त्यांनी म्हटले. पंकजाताई म्हणाल्या होत्या, माझं सीट धोक्यात आहे, म्हणून मी गेल्या वेळेस माघार घेतली होती, पुढच्या वेळेस तुम्ही नक्की. असा शब्द त्यावेळेस ताईंनी दिला होता. त्यावेळी वडिलांनी ताईंना शब्द पाळणार का? असेही म्हटले होते. परंतु आता पुन्हा राजकीय बदल झाले, अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आली आणि आता ठरू लागले, स्टँडींग आमदारांना उमेदवारी! मग आम्ही काय करायचं? आता बास्स! मी निवडणूक लढवणार, कुठून लढवणार, हे लवकरच कळेल. परंतु मी जनतेच्या दरबारात जाईल आणि तुमच्या जोरावर निवडणूक लढवणार आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला टक्केवारी घेणारा आमदार पाहिजे की माझ्यासारखा? अरे ज्यांच्याकडे 20 वर्षांपासून सत्ता आहे, त्यांना बाजाराचा प्रश्न मिटवता आला नाही, नाल्यांचा प्रश्न मिटवता आला नाही, धरण उषाला असताना इथे पाण्याचा प्रश्न उभा आहे. इथे फक्त टक्केवारीसाठी आमदारकी असते आणि पुन्हा आमच्यावर आरोप करताय. यापुढे आम्हाला लक्ष्य केलं तर आमदाराला माजलगावच्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा मोहन जगताप यांनी दिला. त्याचबरोबर या मतदारसंघात उपरा उमेदवार चालत नाही, याआधी एक उपरा आमदार झाला. त्याने काय केले? हे सर्वांना माहित आहे, असेही ते म्हणाले. एकूणच मोहन जगतापांनी भारतीय जनतापार्टीला चांगलेच टार्गेट केल्याचे यातून दिसून आले.