आष्टी (रिपोर्टर ):- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने राज्यव्यापी बंद पुकारला असून आष्टी तालुक्यातील उमेद कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने या बंदमध्ये सहभागी होत कडकडीत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.आष्टी येथील उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कार्यालयासमोर कर्मचार्यांनी निदर्शने करत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी कर्मचार्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद आहे की संघटनेची राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री ग्रामविकास महाराष्ट्र राज्य यांचेसोबत वेळोवेळी बैठक झाली. प्रत्येकवेळी संबंधितांनी लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासित केले. परंतु, अद्यापही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही. 10 ते 12 जुलै रोजीच्या आझाद मैदानात आंदोलन केले होते. यावेळी देखील पत्र देवून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या मागण्या आजपर्यत पूर्ण न झाल्याने अभियानातील सर्व महिला, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री व प्रधान सचिव यांना वेळ मागण्यात आला होता. मात्र शासनाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास ग्रामविकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना अशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देणे या मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि.3 ऑक्टोंबर पासून कामबंद आंदोलन पुकारले असून या राज्यव्यापी आंदोलनात आष्टी येथील उमेद कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनादरम्यान प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला इशारा दिला आहे. यात संबंधित मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनामध्ये तालुका अभियान व्यवस्थापक विक्रम ठोंबरे,तालुका व्यवस्थापक मंगल हजारे , ऑपरेटर जालिंदर रंधवे,निखिल खाडे,इंगळे संदिप,किशोर उंबरहांडे, आदी कर्मचारी सहभागी होते.