बीड शहरातील धार्मिक धर्मगुरूंची जिल्हाधिकार्यांसह पोलिस अधिक्षकांकडे मागणी
बीड, (रिपोर्टर)ः- उत्तर प्रदेश येथील नरसिंहानंद यांनी वादग्रस्त विधान केले. हे वादग्रस्त विधान सामाजिक द्वेष निर्माण करणारे आहे. अशा वादग्रस्त विधान करणार्याविरोधात पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी बीड शहरातील मुस्लिम धर्मगुरूंनी जिल्हाधिकार्यांसह जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली. यावेळी शहरातील निवडक राजकीय पक्षाचे नेते ही उपस्थित होते.
गाझीयाबादचे पुजारी नरसिंहानंद यांनी मुस्लिम धर्म व हजरत मोहंमद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले. त्यांचे हे विधान सामाजिक तेढ निर्माण करणारे आहे. समाजा समाजात जाणीवपुर्वक भांडणे लावण्याचे काम अशा प्रवृत्तीचे लोक करू लागले आहेत. अशा व्यक्तीविरोधात शासनाने कठोर कारवाई करायला हवी. नरसिंहानंद यांचे हे विधान देशद्रोहीपणाचे आहे. अशा व्यक्तींना पायबंद घालणे आज गरजेचे झाले आहे. जेणेकरून पुन्हा कोणी असे गैर वक्तव्य करू नये. नरसिंहानंद यांच्या विरोधात शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शहरातील धर्मगुरू यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्याच बरोबर जिल्हा पोलिस अधिक्षक यांची भेट घेवूनही त्यांना आपल्या मागणीचे निवेदन देवून कारवाई करण्याची विनंती केली. धर्मगुरू यांच्या समवेत बीड येथील काही निवड राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते.