खरचं त्या बॅगमध्ये दोन किलो सोनं होतं का? पोलिसाचां तपास सुरू
नेकनूर (रिपोर्टर): नांदेड येथून मुंबईकडे निघालेल्या सराफा व्यापार्याची सोन्याची बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नेकनूर जवळच्या रविंद्र धाब्यावर मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास घडली. सदरील सराफा व्यापार्याने त्या बॅगेमध्ये तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे दोन किलोपेक्षा अधिक सोने असल्याचा दावा नेकनूर पोलिसात केला आहे. त्या दिशेने पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणी नेकनूर पोलिसांशी रिपोर्टरने संपर्क साधला असता माहिती घेणे चालू आहे, सविस्तर माहिती तपासाअंती देऊ, असे म्हटले.
नेकनूर-मांजरसुंबा महामार्गावर रविंद्र धाबा असून या धाब्यावर जेवण्यासाठी अनेक बस थांबतात. रात्री नांदेडहून मुंबईकडे निघालेली बस या धाब्यावर थांबली. या गाडीमध्ये मुंबई येथील सराफा व्यापारी प्रवास करत होता. तोही या वेळी या गाडीत होता. परंतु अज्ञात चोरट्याने त्याची बॅग तेथून लंपास केली. हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने तात्काळ नेकनूर पोलिसांशी संपर्क साधला. त्या बॅगमध्ये दोन किलोपेक्षा अधिकचे सोने (ज्याची अंदाजे किंमत दोन ते सव्वा दोन कोटी) असल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे. पोलिसांना या दाव्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ते अधिक अधिक माहिती संबंधित व्यक्तीकडून घेत आहेत. रविंद्र धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या व्यक्तीची बॅग अज्ञात व्यक्तीने पसार तर केली हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्या बॅगमध्ये दोन किलोपेक्षा अधिक सोनं होतं का? यावर पोलीस तपास करत आहेत. दोन ते सव्वा दोन कोटी रुपयांच्या सोन्याची लूट झाल्याच्या प्राथमिक माहितीने सर्वसामान्यांसह पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.