बंद, मोर्चाने दुपारपर्यंत माजलगावचे व्यापार ठप्प, मोर्चात महिला-मुलींची लक्षणीय संख्या
माजलगाव (रिपोर्टर): बदलापुरातल्या घटनेने अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडल्यानंतर बदलापूर घटनेची पुनरावृत्ती माजलगावात घडल्याचे उघडकीस आले. एका शाळेतील शिक्षकानेच पाच ते साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना जशी उघड झाली तसे जिल्हाभरातल्या सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काल त्या नराधमाला जेरबंद करण्यात आले असले तरी आज नराधम शिक्षकास फाशी द्या, अन् संस्था चालकावर कठोर कारवाई करा, या दोन प्रमुख मागण्या घेऊन माजलगावकर आज रस्त्यावर उतरले. हनुमान चौकातून अबालवृद्ध आणि महिला-मुली तहसील कार्यालयात कुच करत गेल्या. संतप्त महिलांनी आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. बंद आणि मोर्चाने आज शहरातले व्यापार पुर्णत: ठप्प होते.
सप्टेंबर महिन्यातल्या 27 ते 28 तारखेच्या दरम्यान माजलगावच्या एका शाळेत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. मुलगी आजारी पडल्यानंतर तिला दवाखान्यात दाखवले. त्यावेळी अत्याचारासारखा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी शाळेतील शिक्षकांसह कर्मचार्यांचे फोटो दाखवून ओळख परेड केली तेव्हा राहुल अंबादास वायखिंडे (मूळ रा. ब्रह्मगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) हा नराधम असल्याचे स्पष्ट झाले. काल त्याच्या मुसक्या बांधल्यानंतर आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली मात्र आज संतप्त माजलगावकर रस्त्यावर उतरले. सर्व पक्ष, संगटना, जात-पात-धर्म-पंथ इथे त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी एक झाले.
सर्वप्रथम शहर बंद ठेवून माजलगावकर हनुमान चौकात जमा झाले. हजारोंच्या संख्येने हा संतप्त जमाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसीलवर जावून धडकला. या मोर्चामध्ये महिलांच्या दोनच मागण्या होत्या, नराधम शिक्षकाला फाशी द्या, संस्था चालकावर कठोर कारवाई करा, या वेळी अनेक महिलांनी आणि पालकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. सदरची घटना अत्यंत गंभीर आणि समाज मनाला काळीमा फासणारी. यातील नराधम शिक्षकास तात्काळ फाशी देण्यात यावी, या आशयाचे निवेदन लहान मुलींनी तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले. या वेळी माजी आ. राधाकृष्ण होके पाटील, नारायण डक, जयसिंह सोळंके, गंगाभीषण थावरे, ऐश्वर्या सोळंके, बाबरी मुंडे, अविनाश जावळे, माधव निर्मळ, सहाल चाऊस, अशोक तिडके, तुकाराम येवले, ज्ञानेश्वर मेंडके, दीपक मेंडके, दीलीप झगडे, अरुण राऊत, रुपाली कचरे, गौरी देशमुख, आरती कांडुरे, राकेश साळवे, शेख फेरोज, ममता शिंगाडे, छाया कुलकर्णी, प्रदीप पटेकर, दिनकर शिंदे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होेते.