माजलगावात पक्षाला आडसकर हवेत; खासदारांना जगताप पाहिजेत
गेवराईचे भाजपा आमदार टोपेंसोबत मुंबईत दिसले
आष्टीत धोंडेंच्या पक्षप्रवेशाची चर्चा
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात तगडे उमेदवार देण्याइरादे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आयात उमेदवारांवर अधिक भर दिल्याचे चित्र समोर येत असतानाच बीड विधानसभा मतदारसंघाबाबत महत्वपुर्ण माहिती समोर येत असून विद्यमान आमदारांना डावलून याठिकाणी त्यांचे काका जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याबाबतची निश्चितता झाल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून सांगितले जात आहे. काकाच्या पक्षात बीडचे काकाच उमेदवारीबाबत बाजी मारण्याच्या तयारीत आहेत. तर तिकडे गेवराईत लक्ष्मण पवार, माजलगावमध्ये थेट रमेश आडसकर यांचे नाव आज अधिक तीव्रतेने चर्चेत येत आहे. इकडे आष्टीतही शरद पवारांकडून भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडेंची नुसती चाचपणी नव्हे तर प्रवेशाची चर्चा आता सुरु झाली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत राहिलेली बीड विधानसभा निवडणूक या निवडणुकीत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला आणि तेथूनच संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महत्वाचे स्थान घेऊन बसले. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात संदीप क्षीरसागरांकडून निसटलेले कार्यकर्ते पाहता या निवडणुकीत संदीप क्षीरसागरांची उमेदवारीच धोक्यात आली. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी गेल्या महिनाभरापासून गुफ्तगू सुरु होती. त्या गुफ्तगुला आता अंतिम स्वरुप आले असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीड विधानसभेसाठी थेट जयदत्त क्षीरसागर यांनाच उमेदवारी मिळणार असे संकेत राष्ट्रवादीच्या गोटातून मिळत आहे. त्यामुळे विद्यमान आमदार अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. शरद पवारांनी बीडच्या सहाही विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे आणि थेट भाजपाचे शिलेदार आपल्या काफिल्यात घेण्याची तयारी ठेवली आहे. गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे शरद पवारांच्या निकट असल्याची चर्चा होत असतानाच काल पवार थेट महाविकास आघाडीची ज्या ठिकाणी बैठक सुरु होती. म्हणजेच हॉटेल ट्रायडेंटमध्ये राजेश टोपेंसोबत पहायला मिळाले आहेत. त्यामुळे गेवराईत विद्यमान आमदार शरद पवारांच्या गळाला लागलाय. इकडे माजलगावमध्ये मोहन जगताप यांच्यासह भाजपाचे रमेश आडसकर यांची जोरदार चर्चा होत आहे. पक्ष रमेश आडसकरांना तिकिट देण्याच्या तयारीत आहे. इथे मात्र विद्यमान खासदार रमेश आडसकरांच्या नावाबाबत नापसंती व्यक्त करून ते मोहन जगताप यांचे नाव पुढे करत असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. तर तिकडे आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे हे पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.