संचालक, 13 संस्थांसह 41 जणांवर गुन्हे
बांगरांच्या अटकेने पाटोद्यात खळबळ
पाटोदा/बीड (रिपोर्टर): सहकार महर्षि म्हणून चर्चेत राहणारे रामकृष्ण बांगर यांच्या महात्मा फुले अर्बन बँकेत तब्बल 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार व गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी केलेल्या लेखा परिक्षणात स्पष्ट झाल्यानंतर पाटोदा पोलिसात रामकृष्ण बांगर यांच्यासह त्यांच्या पत्नी तथा बँकेच्या चेअरमन सत्यभामा बांगर यांच्यासह संचालक मंडळ व अन्य तब्बल 41 जणांवर अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सत्यभामा बांगर यांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे की, रामकृष्ण बांगर संस्थापक असलेल्या महात्मा फुले अर्बन बँकेसह अन्य चौदा संस्थांमध्ये 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परिक्षणामध्ये उघड झाले आहे. लेखा परिक्षक बाळासाहेब भोसले यांनी पाटोदा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महात्मा फुले अर्बन बँक लि. पाटोदाचे 1-4-2010 ते 28-8-2023 या मुदतीचे वैधानिक लेखापरिक्षण जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशावरून 8-8-2024 प्रमाणे बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डोरले, मुंडे, सानप व बँकेच्या इतर सह सेवकांनी तपासणीसाठी सादर केलेल्या रेकॉर्डवरून व मिळालेल्या पुराव्यावरून यामध्ये 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार व गैरव्यवहार झाला आहे. यात संस्थापक रामकृष्ण बांगर यांच्यासह चेअरमन सत्यभामा रामकृष्ण बांगर, संदीप जगन्नाथ सानप, बाळु मच्छिंद्र पवार, भाऊसाहेब बाबासाहेब सोनसळे, तुकाराम बावणे, भगवान शिंदे, श्रीरंग उत्तमराव सानप, श्रावण श्रीरंग बांगर, संजय उत्तमराव सगळे, संभाजी विठ्ठलराव मस्कर, भगवान साधुपाखरे, भगवान बाजीराव सोनवणे, राजेंद्र कारभारी गवळी, नवनाथ भगवान नागरगोजे, पांडुरंग निवृत्ती मस्के, रुक्मिनी सुदाम बांगर, रफिक मोहम्मद पठाण, सिताबाई अरुण जावळे, रामकृष्ण मारोती बांगर, बाबासाहेब भिमराव राख, रणजीत नारायण चौरे सुरेश दत्तात्रय पुराणिक, प्रदीप दत्तात्रय कुलकर्णी, भिमराव बाजीराव सानप, दिनकर सिताराम बांगर, शामराव यशवंत कंठाळे (मयत) विष्णू विलास थोरवे, महादेव श्रीमती बांगर, राजाभाऊ नामदेव बावणे, बाळासाहेब शामराव बांगर, लक्ष्मण श्रीहरी शिंदे, नवनाथ भगवान नागरगोजे, बाबासाहेब भगवान नागरगोजे, हनुमंत रंगनाथ भोसले, प्रभाकर प्रल्हाद गित्ते, प्रदीप बाबूराव गिरे, रविंद्र निवृत्ती उगले, जनार्धन मारोती कंठाळे, गुलानभाई मेंगडे, रामचंद्र बाजीराव रांजवण, संजय भिमराव सानप यांच्या विरोधात कलम 420, 406, 709, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात तात्काळ बँकेच्या चेअरमन सत्यभामा बांगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.