मुंबई (रिपोर्टर): राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू असून एकापाठोपाठ निर्णयांचा धडाका लावलेला दिसत आहे. महायुती सरकारने टोलमाफीनंतर आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. धारावी पुर्नविकासासाठी आणखी 125 एकर जागा दिली जाणार आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देणार माहिती समजत आहे. याआधी झालेल्या मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये बोरिवलीमधील जागा देण्यात आली होती. अदानी समुहाकडे धारावी पुर्नविकास प्रकल्प आहे. मात्र अदानी समूहाला जमिनी दिल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद होण्याची दाट शक्यता आहे. धारावी विकास प्रकल्प अदानींकडे दिल्याने महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. आता या निर्णयावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महायुती सरकारने मुंबई विकायला काढली आहे. अदानी यांच्या घशात मुंबई घालण्याचा सरकारचा डाव आहे. धारावीसाठी इतर राखीव प्रकल्पांच्या जागा देत आहे. मुंबईचं वाटोळ करत असल्याची सरकारला कोणतीही भीती नाही. मुंबईमध्ये टोलमाफीचा घेतलेला निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे. राज्यातील तिजोरीचं यांना काही पडलेलं नसून फक्त निवडणुका जिंकायच्या असल्याचं म्हणत अनिल परब यांनी या निर्णयावरून टीका केली आहे.
मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफ
मुंबईमधील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर, मुलुंड – एलबीएस, आनंदनगर, ऐरोली आणि वाशी या टोलनाक्यांवर आता हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. हलक्या वाहनांना चाळीस रूपये टोल द्यावा लागत होता. आज रात्री बारा वाजल्यापासून टोलमाफी लागू होणार आहे. त्यासोबतच आणखी काही निर्यण घेण्यात आले आहेत.