निवडणुकीच्या घोषणेकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष
मंत्रालयासह राज्यभरातील कार्यालयात कामकाज आवरण्यासाठी गर्दी
मुंबई (रिपोर्टर): 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी वेगवेगळ्या पक्ष-संघटनांकडून सुरु असून प्रमुख पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. महायुतीतील तीन पक्षांचे जागा वाटप 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर शिक्कामोर्तब झाला आहे तर महाविकास आघाडीचीही तयारी तेवढीच पहावयास मिळत आहे. आज मंत्रिमंडळाची महत्वपुर्ण कॅबिनेट बैठक झाल्यानंतर उद्या राज्यात आदर्श आचारसंहिता लागण्याची चर्चा होत आहे. मात्र विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीकडून आणखी एक मंत्रिमंडळ बैठक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून आणखी तीन ते चार दिवस निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नाही. मात्र 18 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात निवडणुकीची घोषणा होत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सरकारमधील भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातील जनतेला खूश करण्यासाठी गेल्या महिनाभराच्या कालखंडात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकांवर बैठका घेत निर्णयांचा सपाटा सुरू ठेवला आहे. आज पुन्हा एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीत 19 महत्वपुर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली. तर इकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रचंड इच्छूक असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची घोषणा केव्हा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असू शकते म्हणून राज्यभरातील लोकांची मंत्रालयामध्ये मोठी वर्दळ पहावयास मिळाली. आचारसंहितेपूर्वी वेगवेगळे कामे उरकून घेण्याचा सपाटा मंत्रालयात सुरु असल्याचेही दिसून येत असून काहींच्या मते आचारसंहिता उद्या लागण्याची शक्यता आहे मात्र रिपोर्टरच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 20 च्या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते असे सांगितले जाते.