बीड (रिपोर्टर): धर्मापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्मचार्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
शाखा व्यवस्थापक राहुल भालेकर यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी जीवघेणा हल्ला झाला. यासंबंधी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वीचे व्यवस्थापक इरफान शेख यांच्यावरही अशाच पद्धतीचा हल्ला करण्यात आला होता. व्यवस्थापक राहुल भालेकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी तुषार फड असून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बँकेच्या कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत निदर्शने केली. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.