सराटे अंतरवली (रिपोर्टर): 2024 ची निवडणूक लढवू इच्छीणार्यांसोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या दि. ऑक्टोबर रोजी बैठक घेत असून 20 तारखेला मराठा समाजाची महत्वपुर्ण बैठक घेऊन त्या बैठकीत निवडणूक लढवायची की निवडणुकीत पाडायचे यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महायुती सरकारने आमच्या लेकरांना आत्महत्या करण्यास भाग पाडले, हा आमचा फायदा आहे का? आमच्या महिलांवर गोळ्या झाडल्या हा आमचा फायदा आहे का? हजारो मुलांवर केसेस केल्या हा आमचा फायदा आहे का? असे एक ना अनेक प्रश्न विचारत मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले, राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस जाणीवपुर्वक मराठ्यांना टार्गेट करत असल्याचे म्हटले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत 2024 विधानसभा निवडणुकीच्या तयारी बाबत दोन बैठकांचा निर्णय घेतला. उद्या 17 ऑक्टोबर रोजी राज्याती इच्छुकांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे, गाफील न राहता सावध राहून सर्व कागदपत्र काढून घ्यावेत, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर 20 तारखेला अंतरवली सराटी याठिकाणी समाजाची महत्वपूर्ण बैठक होत आहे. ही बैठक शक्ती दाखवण्यासाठी नाही त्यामुळे जे येऊ शकतात त्यांनी यावे, आता समाजाला खर्चात टाकायचे नाही, येताना डब्बे घेऊन यावे, ही बैठक सकाळी नऊ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत राहील आणि याच बैठकीत उमेदवार उभे करायचे की, पाडायचे यावर निर्णय होईल. आज महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये महायुतीने मराठा समाजाला काय काय दिले हे जरांगेंनी पहावे, असे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, त्यावर जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आणि म्हणाले, आमच्या पोरांनी आत्महत्या केल्या, तो आमचा फायदा आहे का? आमच्या आया बहिणींवर गोळ्या झाडल्या, आमच्या मुलांवर केसेस केल्या, सग्यासोयर्यांचा अध्यादेश काढला नाही, गॅझेटप्रमाणे काम केले नाही. सग्यासोयर्यांना प्रमाणपत्र दिले नाही, आम्ही मागितलं नसलेलं आरक्षण आम्हाला दिलं. शिंदे समितीला नुसती मुदतवाढ दिली, ती समिती काम करत नाही, कुणबी नोंदी सापडत असताना प्रमाणपत्र दिलं जात नाही हा आमचा फायदा आहे का? असे एक नव्हे तर 25 ते 30 सवाल जरांगे यांनी उपस्थित केले आणि उद्याच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले.