जालना :जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठी घोषणा केली आहे. विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. अंतरवाली-सराटीतील सभेत भाषण करताना त्यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर महायुतीला मराठवाड्यात महागात पडला होता. आता विधानसभेला जरांगेंनी थेट निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केलेली आहे.त्यांनी तीन सूत्रावर सर्वसमावेशक निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच संताप व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.
हे तीन सूत्र
जिथे निवडून येतील तिथे उमेदवार द्यायचा. जिथे राखीव जागा आहेत तिथला उमेदवार आपल्या विचाराचा असेल. त्याला मतदान करावे. जिथे आपण उभा करणार नाही तिथे जो उमेदवार 500 रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल त्या उमेदवाराला मतदान द्यावे, असे भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.
राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही
मनोज जरांगे म्हणाले की, मी या समाजाला माय बाप मानलं आहे. ज्या टोकाला जायचं नव्हतं त्या टोकाला जायची वेळ आली. हा संघर्ष राजकारणासाठी नव्हताच. गरजवंत मराठ्यांना राजकारणाची गरज नाही. राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही. कधी काळी मुलांसाठी आम्ही उठाव केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे आहे, धर्मपरिवर्तन नाही. मी शिवरायांचे हिंदुत्व मानतो. मराठ्यांना माझं आव्हान आहे की, कोणाचे ऐकून कोणाशी भांडायचे नाही. इंग्रज तरी बाहेरून आले होते. फडणवीस इथलेच आहेत. ते जगातील सर्वात क्रूर माणूस आहेत. शिंदे समितीला 8 हजार पुरावे सापडले, 14 महिने त्त्यांनी मागणी पूर्ण केली नाही. भाजपचा काय दोष आहे? चालवणारा माकड चांगलं नाही, भाजपमध्ये काही चांगले लोक आहेत. भाजपचा दोष नाही, इथून मागे काय ते आपले शत्रू होते का? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
माझी तळमळ समाजासाठी
ते पुढे म्हणाले की, यावेळी एक शिक्का मराठ्यांचे मतदान होणार आहे. खोटे असणारे मतदार बाहेर काढा. गाव खेड्यातला ओबीसी आपल्या सोबत आहे. आपल्याला संपवण्याचा विडा उचलणाऱ्याला आपलयाला संपवायचं आहे. बहुमताने एका बाजूला ताकद वापरली तरी विजय प्राप्त करता येतो. मराठे काय असतात हे तुम्ही एकदा दाखवलं ना? आता पुन्हा एकदा दाखवा. निवडणुका येतात आणि जातात. आपला समाज सागरा सारखा पसरलेला आहे. काहीही करून समाज संपवू नका. आपल्याला महविकास आघाडी आणि महायुतीचं काही देणं घेणं नाही. आपला समाज राजकारणात खूप आहे. माझी तळमळ समाजासाठी आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
महाविकास आघाडी आणि महायुती मावस भाऊ
यानंतर मनोज जरांगे यांनी बैठकीत आलेल्या समाज बांधवांना उमेदवार लढवायचे की पाडायचे? असा सवाल विचारला. यावेळी समाज बांधवांनी उमेदवार उभे करायची मागणी केली. यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, पाडायचे पाडा उभे करायचे करा, पण माझी निवडणुकीकडे जायची इच्छा नाही. राजकारणाकडे आपण जाऊ नये असं मला वाटतं. महाविकास आघाडी आणि महायुती मावस भाऊ आहेत. आपण उभे केले तर भाजपवाले खुश होतील. नाही केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतील. तुम्हाला हरण मला परवडत नाही, हे आपली वाट बघत आहेत, त्याच्या याद्या दिल्लीत पडून आहेत, त्यांचे बरेच लोक आमच्या मागे येणार आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले.
मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार
यानंतर मनोज जरांगेंनी मी 30 ते 40 दिवस राजकारणात जातोय, नंतर पुन्हा सर्व समजाचा आहे. जिथे निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं. ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो 500 रुपयांच्या बॉण्डवर लिहून देईल, त्याला आपण निवडून आणायचे बाकीचे सर्व पाडायचे, अशी घोषणा त्यांनी केली.