बीड (रिपोर्टर): 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. आज महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तीन मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. बीडमधून विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, केजमधून पृथ्वीराज साठे तर माजलगावमधून रमेश आडसकरांचं नाव समोर आणण्यात आले आहे. बीड, केज नाव निश्चिती झाली तर माजलगावच्या नावाबाबत अद्याप स्पष्टता रिपोर्टरच्या हाती आली नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीडला कुठला उमेदवार येणार, यावर चर्चेचे गुर्हाळ गेल्या काही दिवसांपासून चालू होते. नुकतेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये बीडच्या मातब्बरांचे प्रवेश झाले. यामध्ये शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे, भाजपाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र मस्के, दिलीप गोरे यांनी नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केले. त्यामुळे विद्यमान आमदाराचे याठिकाणी तिकीट कापले जाणार, अशी चर्चा होत होती मात्र एकनिष्ठतेला शरद पवारांनी महत्व देत बीड विधानसभेचे तिकीट पुन्हा संदीप क्षीरसागर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे तर इकडे केजमधून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. माजलगावमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपाचे तत्कालीन नेते रमेश आडसकर यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे.