बीड (रिपोर्टर): बीड विधानसभा मतदारसंघासाठी महायूतीतील जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बातम्या येत आहेत, जागा याला सुटली, त्याला सुटली मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. आजचा मुहूर्त चांगला असल्याने मी बीड शहरात आलो आहे आणि आता आम्ही पती-पत्नी आपआपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. मी एवढेच सांगतो मी दाखल केलेला उमेदवारी अर्ज हा परत घेण्यासाठी नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन योगेश क्षीरसागर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांशी बोलताना केले.
बीड विधानसभा मतदारसंघातला महायूतीतील जागेचा प्रश्न अद्याप मिटलेला दिसून येत नाही. बीडची जागा शिंदे गटाला सुटते की अजीत पवार यांच्या गटाला, उभ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. अशा स्थितीत मुंबईत डेरेदाखल असलेले अजीत पवारांकडील इच्छूक उमेदवार योगेश क्षीरसागर हे बीडमध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले अजून या जागेचा तिढा संपलेला नाही अथवा सुटलेला नाही. कोणी काहीही म्हणत असेल ही जागा याला सुटली त्याला सुटली मात्र अद्याप तिढा सुटलेला नाही. आज मुहूर्त चांगला असल्याने मी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. त्याचबरोबर माझी पत्नी सारीका क्षीरसागर यांचाही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. अद्यापही महायूतीकडून आपल्याला अपेक्षा आहेत. असेही योगेश क्षीरसागरांनी म्हटले. त्याचबरोबर त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवतींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.