माजलगाव (रिपोर्टर): महाविकास आघाडीकडून रमेश आडसकरांऐवजी मोहन जगतापांचे नाव घोषीत झाल्यानंतर उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांनी पुन्हा एकदा रात्रीतून बारामती गाठत काकांना दिलेली उमेदवारी आपल्याला द्यावी, अशी कार्यकर्त्यांसमवेत मागणी केल्याचे सांगण्यात येते. रात्री जयसिंह सोळंके आणि अजित पवारांची भेट झाल्याचे सांगण्यात येत असून जयसिंह सोळंके यांची समजूत काढली जात असल्याचेही बोलले जात आहे. विद्यमान आमदार प्रकाश सोळंकेंना उमेदवारी मिळाल्यानंतर सोळंकेंच्या घरात कुरबूर सुरू असल्याची मतदार संघात चर्चा आहे.
विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा गेल्या तीन महिन्यांपूर्वी केली आणि आपले राजकीय वारसदार म्हणून पुतणे जयसिंह सोळंके यांना समोर केले. मतदारसंघात जयसिंह सोळंके यांनी मोठ्या ताकतीने प्रचार सुरू केला, भेटीगाठी केल्या, मात्र महायुती राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि बीड जिल्ह्यातील स्फोटक परिस्थिती पाहता प्रतिस्पर्धी उमेदवाराला शह देण्यासाठी प्रकाश सोळंके हे तगडे उमेदवार आहेत, त्यामुळे या वेळेस प्रकाश सोळंकेंना निवडणूक रिंगणात राहू द्यावं, असे स्पष्टीकरण देत जयसिंह सोळंकेंना थोडं शांत राहण्याबाबत सांगण्यात आलं. भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले रमेश आडसकर हे सोळंकेंसाठी तगडे आव्हान असू शकते म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा प्रकाश सोळंकेंना रिंगणात उतरवल्याचे सांगितले जात होते. मात्र रमेश आडसकरांना आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही आणि त्याठिकाणी मोहन जगतापांना उमेदवारी घोषीत झाली त्यामुळे जयसिंह सोळंकेंच्या समर्थकांनी आता दादा ऐवजी भैय्या उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर रात्रीतूलन पन्नास-शंभर समर्थकांच्या गाड्या भरून जयसिंह सोळंके थेट बारामतीत गेले. त्याठिकाणी त्यांनी अजितदादांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. त्या भेटीतला तपशील समजला नसला तरी जयसिंह सोळंकेंची समजूत काढली असल्याचे सांगण्यात येते.