आष्टी (रिपोर्टर): आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आपण स्वत: अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे रात्री उशिरा माजी आ. सुरेश धस यांनी घोषणा करत अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते, समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रात्रीतून धसांच्या आवाहनाला आष्टीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि हजारोंच्या संख्येने सुरेश धस आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलकडे कूच करत आहेत. शहरातून भव्य रॅली निघाली असून सुरेश अण्णा तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, च्या घोषणांनी आष्टी शहर दणाणून गेले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असेल? इथली जागा राष्ट्रवादी की भाजपाला सुटेल यावर तर्कवितर्क आणि राजकीय खलबते काल संपुष्टात आले. रात्री उशिरा माजी आ. सुरेश धसांनी सोशल मिडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसारीत केला. त्यामध्ये भाजपा, शिंदे सेना, रिपाइं, अजित पवार राष्ट्रवादीसह अन्य सह पक्षांचा म्हणजेच महायुतीचा उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करत आहे. या वेळी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. धसांच्या आवाहनाला आज सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भव्य रॅली काढत सुरेश धसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चाकै, कमान वेस, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, महावीर चौक, महात्मा ज्योतीबा चौक मार्गे ही रॅली ढोलताशांच्या गजरात सुरू होती. महामानवांना पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी वसिमा शेख यांच्याकडे सुरेश धसांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार तळ येथील मैदानात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. त्याठिकाणी सुरेश धस आपल्या समर्थकांना संबोधित करत आहेत.