बीड (रिपोर्टर): मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सक्रिय राजकारणात उडी घेत आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे थेट आदेश दिले. बीड विधानसभा मतदारसंघातून तब्बल 17 इच्छूक आज दुपारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पुर्वी दुपारी एक वाजेपर्यंत बीड विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सुरेश नवले, विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह खांडे, गवते, मस्के यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
बीड विधानसभा मतदारसंघामधून इच्छुकांची बहुगर्दी दोन महिन्यांपूर्वीच पहावयास मिळत होती. आता प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करत इच्छुक मैदानात उतरत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार कोण असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून असून जरांगे यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी फौज आहे, म्हणून की काय, तब्बल 17 इच्छुक आज दुपारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने बी.बी. जाधव, रमेश पोकळे, गंगाधर काळकुटे यांच्यासह आदींचा समावेश आहे. दुपारी एक वाजेपर्यंत बीड विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री सुरेश नवले, कुंडलिक खांडे, बळीराम गवते, भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले राजेंद्र मस्के यांनी आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
0000
केजमधून नमिता मुंदडा यांचा अर्ज दाखल
ठोंबरेंनी शक्तीप्रदर्शन करून दाखल केली उमेदवारी
केज (रिपोर्टर): केज विधानसभा मतदारसंघामधून भाजपाच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच अपक्ष म्हणून संगिता ठोंबरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. ठोंबरेंनी प्रथम गोपीनाथगडावर जाऊन स्व. मुंडे यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातून रॅली काढली व अर्ज दाखल केला.
केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने आ. नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली. मुंदडांनी आज दुपारी आपला अर्ज दाखल केला. संगिता ठोंबरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी परळी येथे गोपीनाथगडावर जाऊन मुंडेंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपला अर्ज दाखल केला आहे.
000
गेवराईमध्ये माजी मंत्री बदामरावांची उमेदवारी दाखल
गेवराई (रिपोर्टर): गेवराई मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी मंत्री बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली. पंडितांनी शहरातून रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंसह दोन्ही जिल्हाप्रमुख उपस्थित होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री बदामराव पंडित यांना गेवराईमधून उमेदवारी देण्यात आली. पंडित यांनी आज शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल केली. या वेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.