व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन
बीड (रिपोर्टर): गेली अनेक वर्ष माझे वडील डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बीडच्या नगराध्यक्षपदी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा आणि माझाही जनसंपर्क हा बीड शहरात होता. पण आता आम्हाला ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनताही आमच्यासोबत आहे. ना.अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली बीड मतदारसंघाचा विकास होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबईतून बुधवारी (दि.6) पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. तर बीडमधून पक्षाच्या संपर्क कार्यालयात प्रकाशन सोहळ्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, बीडचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ड.प्रज्ञा खोसरे, माजी नगरसेवक गणेश वाघामारे, बाबुराव दुधाळ, प्रेम चांदणे, रणजित बनसोडे, भास्कर जाधव, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश शिंदे, युवक तालुकाध्यक्ष नंदू कुटे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अद्ययावत आरोग्य सुविधेचा वादा, सर्वांनी शिक्षणाच्या पायाभरणीचा वादा, दर्जेदार आणि पायाभूत सुविधांचा वादा, शेती व शेतकर्यांच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा, असे सगळे वादे ना.अजितदादा पवार हे या निवडणुकीत घेऊन आलेले आहेत. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आजपर्यंत आपणही बीड शहरात, ग्रामीण भागात असतील, ज्या काही सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो, त्या ना.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत देऊ शकलेलो आहोत. यापुढेही बीड तालुका, शिरूर तालुक्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे राहावे, असे आवाहन देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष
आ.इद्रिस नाईकवडी यांचे जंगी स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष तथा आमदार इद्रिस नाईकवडी हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांचे बीडमध्ये आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकार्यांनी स्वागत केले. ते अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्याला संबोधित करणार होते. कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.