शिरूर कासार (रिपोर्टर): महायुतीचे बीड विधानसभेचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी मतदारसंघात प्रचाराचा झंझावात सुरू केला असून शिरूर कासार तालुक्यात गुरुवारी (दि.7) प्रचार दौरा केला. दौर्यात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामे झाली नाहीत. हा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही महायुतीचे बीड विधानसभेचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
शिरूर कासार तालुक्यात सकाळी 7 वाजल्यापासून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला होता. दुपारपर्यंत फुलसांगवी, मार्कंडवाडी, हाजीपुर, गाजीपुर,जांब, शिरापूर गात, पौंडूळ क्र.3, कमलेश्वर धानोरा येथे ग्रामस्थांशी संवाद साधत येत्या 20 तारखेला मला मतदान करून आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत पाठवावे, असे आवाहन केले. त्यांच्या दौर्यास मतदारसंघात मोठा प्रतिसाद पहावयास मिळत आहे. शिरूर कासार तालुक्यातील प्रचाराची सुरुवात फुलसांगवी येथून झाली. फुलसांगवी येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी गावकर्यांशी संवाद साधताना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर गावातील नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की, लोकांच्या मागण्या पूर्ण करू. सर्व समजातील घटकाला सोबत घेऊन विकासकामे करायचे आहेत. मागील पाच वर्षात कामे झाली नाहीत, ते सर्व कामे येणार्या पाच वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बीड शहराप्रमाणे ग्रामीण भागात देखील दर्जेदार कामे करायची आहेत. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे देखील डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.
आमदार पुन्हा गावात आलेच नाहीत!
आमदार संदीप क्षीरसागर हे निवडून आल्यानंतर आमच्या गावात आलेच नाहीत, त्यांनी पुन्हा तोंड दाखविले नाही. दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे आता त्यांना गावात आल्यास जाब विचारणार असल्याच्या संतप्त भावना अनेक गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. दरम्यान, शिरूर कासार तालुक्यातील जनतेवर अशा प्रकारे आपल्याकडून कधीही अन्याय होणार नाही, असा विश्वास डॉ.योगेश क्षीरसागर यांनी ग्रामस्थांना दिला.