हरियाणामध्ये होणार तीन दिवसीय प्रशिक्षण
बीड (रिपोर्टर) भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने हरियाणा मधील गुरुग्राम येथे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या राज्य संयोजकपदी बीड येथील भाजप नेते तथा अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहाँगीर यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने अल्पसंख्यांक समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने दि. 25 , 26 , आणि 27 जुलै रोजी हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी देशभरातील प्रत्येक राज्यांमधून तीन व्यक्तींना या प्रशिक्षण शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये राज्याचे अध्यक्ष महामंत्री आणि प्रशिक्षण संयोजक यांचा समावेश आहे. राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्चाचे डॉ. मो. आमीन यांनी महाराष्ट्रातून भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख , महामंत्री जुनेद खान आणि प्रशिक्षण संयोजक म्हणून बीड येथील भाजप नेते सलीम जहाँगीर यांना निमंत्रित केले आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहेत. भाजपच्या राज्य संयोजकपदी सलीम जहाँगीर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.