बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात परळी आष्टी व बीड या तीन ठिकाणी काल जाहीर सभा घेतल्या. आपल्या भाषणातून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र व अर्थशास्त्र मांडणार्या पवारांनी बीड जिल्ह्यात मात्र नेहमीचाच कित्ता गिरवत बीड जिल्हा वासीयांची घोर निराशा केल्याचे पाहायला मिळाले.
परळी सह उर्वरित दोनही सभांमध्ये शरद पवारांकडून कोणत्याही विकासाच्या मुद्द्याला हात घालण्यात आला नाही. उलट आपल्या स्वभावाच्या विपरीत जाऊन आपल्याच पक्षात काम केलेल्या जुन्या तरुण सहकार्यावर टीका करण्यात शरद पवारांनी धन्यता मानल्याचे पाहायला मिळाले.
बीड जिल्हा हा कमी पावसाचा व दुष्काळी समजला जातो त्यामुळे येथील बहुतांश लोकसंख्या अजूनही आर्थिक दृष्ट्या मागास आहे. त्यामुळे देशाचे नेते समजल्या जाणार्या शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात आल्यानंतर परळी आष्टी किंवा बीड या तीनही ठिकाणी आपले विकासाचे व्हिजन मांडणे अपेक्षित होते. महाराष्ट्राचे सलग तीनदा मुख्यमंत्री असताना मराठवाड्याच्या तोंडचे पाणी पश्चिम महाराष्ट्राला पळवले असा आरोप नेहमी शरद पवारांवर व्हायचा. त्यादृष्टीने मराठवाड्याच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर शरद पवारांनी बोलणे अपेक्षित होते; मात्र तेही झाल्याचे पाहायला मिळाले नाही.परळी मध्ये जाऊन महादेवाचे पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी शहराची आणि परळीकर नागरिकांची दहशत आणि दादागिरी च्या नावाखाली बदनामी करणारे वक्तव्य शरद पवारांनी केले. परळीतल्या खंडणी, खून असे अनेक गंभीर आरोप असलेल्या व अनेक वर्ष जेलमध्ये राहिलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराला शरद पवार आपल्या पक्षात मानाचे स्थान देतात आणि सामान्य जनतेसमोर मात्र साळसूदपणाचा आव्हानतात हे परळीच्या जनतेला रुचलेले दिसत नाही. परळीत धंदे – व्यवसाय सुरक्षित नाहीत, ते दडपशाही खाली वावरतात असे अजब वक्तव्य पवारांनी केले. मात्र ते परळीकरांना रुचलेले दिसत नाही, याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे दिसले. विशेष म्हणजे पवारांच्या तोंडून, बघून घेतो, धडा शिकवतो, यांसारख्या शब्दांची लोकांना अपेक्षा नव्हती!