बीड (रिपोर्टर): गेली 39 वर्षे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत सातत्याने विधानसभेच्या पहिल्या पायरीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत उभे राहिलेले अनिल जगताप यांच्यावर पुन्हा यावर्षीही पक्षाने अन्याय केला. मात्र पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत मतदारसंघातील मतदारांसाठी आणि क्षीरसागर मुक्तीसाठी अनिल दादांनी निवडणूक रिंगणात ताठरतेने उभा राहणे पसंत केल्याने मतदार अनिल दादांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत असून अनिलदादांबाबत मतदारसंघात भावनिक लाट उसळत आहे. बालाघाटापासून ते थेट ग्रामीण भागातल्या बांधापर्यंत अनिल जगतापांची चर्चा होत असल्याने बीड विधानसभा मतदारसंघात खरी लढत अनिल जगताप विरुद्ध क्षीरसागर अशी होताना दिसून येत आहे.
बीड विधानसभा मतदारसंघावर क्षीरसागर घराने सातत्याने अधिराज्य गाजवले. निवडणुका आल्या की, क्षीरसागर नको, ची जोरदार चर्चा होते, मात्र मतांच्या धु्रवीकरणात क्षीरसागर पुन्हा बाजी मारतात. या निवडणुकीत मात्र आता पिडितांसाठी लढायचं, ठरवल्याचे दिसून येते. सर्वसामान्य जनता ही क्षीरसागरांच्या एकाहाती राजकारणाला कंटाळल्यामुळे क्षीरसागर मुक्तीसाठी पक्षाकडून सातत्याने पिडित राहिलेले अनिल जगताप यांच्या पाठीशी उभा राहण्याचे ठरवल्याचे सांगण्यात येते. अनिल जगताप यांना वेळोवेळी प्रत्येक निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले गेले, मात्र ऐन वेळी त्यांना डावलण्यात आले. या वेळेस मात्र अनिल जगताप यांनी कुठल्याही स्थितीत मतदारसंघातल्या मतदारांसोबत राहत क्षीरसागरांविरोधात राजकीय दोनहात करण्याचे ठरवले. शिंदे सेनेचा राजीनामा देत आपला नेता फक्त मतदारसंघातला मतदार असल्याचे सांगत अनिल जगतापांनी थेट क्षीरसागरांना आव्हान दिले, त्यामुळे मतदारसंघातले कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, श्रमिक हे अनिल दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे बालाघाट ते ग्रामीण भागातल्या बांधा-बांधावरच्या चर्चेतून दिसून येत आहे. ‘माहौल बदल गया है’ म्हणत मुस्लिम समाजही आता क्षीरसागरांपेक्षा अन्य पर्याय म्हणून अनिल जगताप यांच्याकडे पहात आहे. काल राजीनामा दिल्यानंतर मतदारसंघात अनिल जगतापांबाबत एक भावनिक लाट निर्माण झाली आहे आणि या लाटेवर स्वार होत अनिल जगताप या वेळेस क्षीरसागरांवर मात करतील, असे जानकारांचेही सांगणे आहे.