परळी (रिपोर्टर): जिल्ह्याच्याच नव्हेतर राज्याच्या राजकारणावर कायम दबदबा निर्माण करून सोडणारे आणि आमदार, खासदारांचा कारखाना म्हणून राज्यभरात ओळखले जाणारे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचाराचा पॅटर्न मुंडे बंधू-भगिनींनी राबवायला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकाला मतदारसंघात न आणता स्व. मुंडे ज्या पद्धतीने मतदारसंघातल्या मतदारांसोबत एकरूप व्हायचे आणि केवळ उजनी, बर्दापूर, सिरसाळा, परळी या ठिकाणी जाहीर सभा घ्यायचे त्याच पद्धतीने मुंडे बंधू-भगिनींनी आपली प्रचार यंत्रणा राबविली आहे. आज उजनी येथे सहा वाजता तर बर्दापूर येथे रात्री आठ वाजता भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची संयुक्त सभा होत आहे.
निवडणुकीमध्ये मतदारांशी संवाद कसा असावा, त्यांच्या सोबतचा संपर्क कसा करावा, मतदारसंघाबरोबर आपल्या पक्षाच्या राज्यभरातील उमेदवारांचा प्रचार करत रात्री पुन्हा परळीमधील स्वत:च्या मतदारांशी कुठे आणि कसे बोलावं, हे स्व. गोपीनाथराव मुंडेंना चांगलं माहित होतं. म्हणूनच मुंडेंच्या राजकीय कर्तृत्व कर्माला जादुची कांडी म्हणून संबोधलं जायचं. पक्षाचा एकही स्टार प्रचारकाला त्रास न देता स्वहिमतीवर स्व. मुंडे स्वत:ची निवडणूक लढवायचे. तीच नीती, तोच गनिमी कावा आणि त्या शिकवणीची जादुची कांडी आता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी आपल्या हाती घेतली आहे. परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे हे महायुतीकडून रिंगणात आहेत. कुठल्याही स्टार प्रचारकाला आपल्या मतदारसंघात न आणता या मुंडे बंधू-भगिनींनी स्व. मुंडेंचा प्रचार पॅटर्न या निवडणुकीत राबवण्यास सुरुवात केली. स्व. मुंडे हे उभ्या प्रचारात उजनी, बर्दापूर, सिरसाळा आणि परळी या चार ठिकाणी जाहीर सभा घेत मतदारांसोबत संवाद साधायचे. तसेच मुंडे बंधू-भगिनींनी केल्याचे पहावयास मिळते. आज सायंकाळी सहाव ाजता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उजनी येथे सभा आहे, तर रात्री आठ वाजता बर्दापूर येथे या दोघांची सभा आहे. जानकारांच्या मते जे स्व. मुंडेंचे कर्तृत्व कर्म जोपासेल तो कधीच परळी मतदारसंघात पराभूत होणार नाही.