बीड (रिपोर्टर): आमदारांच्या वरदहस्तामुळे पवनचक्की कंपन्यांकडून बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील शेकडो शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. आर्थिक हितसंबंधातून पवनचक्की कंपन्यांना आमदारांचे पाठबळ मिळत आहे. परंतु बालाघाटवरील अन्यायग्रस्त शेतकर्यांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे. दरम्यान, अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बीड तालुक्यातील बालाघाटावरील 10-12 गावांच्या परिसरात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम करणार्या कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी शेतकर्यांसोबत अरेरावीची भाषा करतात. कंपन्यांनी शेतीमध्ये टॉवर उभारले असून या टॉवरवरील तारा ओढताना पिकांचे नुकसान झाले. त्याची शेतकर्यांना कसल्याही प्रकारची भरपाई दिली मिळत नाही. तसेच, टॉवर व विद्युत तारांमुळे बाधित होणार्या शेतीची नुकसान भरपाई कंपनीने निश्चित केलेली नाही. त्यामुळे ही भरपाई देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे अपेक्षित होते. तसेच, कंपनीकडून यापूर्वी शेतकर्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी चेक दिलेले आहेत, त्यापैकी अनेक चेक बाऊन्स झालेले असून ही शेतकर्यांची फसवणूक आहे. अशी अनेक प्रकरणे असताना कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी शेतकर्यांना अरेरावीची भाषा करतात आणि आमदार बघ्याची भूमिका घेतात. यावरून कंपन्यांचे आमदारांशी आर्थिक हितसंबंध आहेत, हे स्पष्ट होते. असे असले तरी कोणत्याही शेतकर्याची पिळवणूक होत असल्यास माझ्याशी संपर्क करून तक्रारी द्याव्यात. आपण पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करू, असेही पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही जिल्हाधिकार्यांकडे तक्रार; ठोस कार्यवाहीची शेतकर्यांना अपेक्षा
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शेतकर्यांच्या शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन काही महिन्यांपूर्वी पवनचक्की कंपन्यांच्या गैरकारभाराबाबत तक्रार केली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आमदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याने कंपन्यांविरोधात अद्याप ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही.