मुंबई (रिपोर्टर): काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावातून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे. तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर आज एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईत बैठक होणार होती. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, एकनाथ शिंदेंनी मागितलेलं गृह खातं शिवसेनेला मिळणार का?, मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार?, याबाबत चर्चा होणार होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांनी सर्व बैठका रद्द केल्याने महायुतीची बैठक देखील आता लांबणीवर गेली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढल्या-
दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी हालचाली वाढल्या आहेत. मंत्रिपदासंदर्भात चर्चेत असणारी नेते सागर बंगल्यावर पोहोचत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आजही सागर बंगल्यावर नेते पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन तसंच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झाले आहेत. माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन यांची नावं मंत्रिपदासंदर्भात चर्चेत आहेत.
अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवली-
अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणार्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळात इच्छुक माजी मंत्री असेल, तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कामकाज कशा प्रकारे केलं?, संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता?, महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती?, याबाबत अमित शाह यांनी रिपोर्टकार्ड मागवलं आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला?, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थितीत निर्माण झाली होती का? वादग्रस्त वक्तव्य केली का?, या मुद्यांचं रिपोर्टकार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शाह यांनी दिल्लीत बोलावलं आहे.