पिंपळ्याच्या गहिनीनाथ नगर येथील घटना ; घटना स्थळी एपीआय अमन सिरसट दाखल
वडवणी (रिपोर्टर):- शेतातून वेचून आणलेला कापूस घरात एकत्र करुन ठेवला होता. हा कापूस विक्री करण्यासाठी काल सायंकाळच्या वेळी एका पिकअपमध्ये भरुन सदरील पिकअप घरासमोर लावला होता. अज्ञात व्यक्तीने यावर पाळत ठेवत मध्यरात्रीचा फायदा घेत पिकअपच पळविल्याची घटना वडवणी तालुक्यातील पिंपळारुई येथील गहिनीनाथ नगर येथे घडली आहे. तर सदरील पिकअपमध्ये तब्बल अठरा क्विंटल कापूस होता असे सांगण्यात येत असून वडवणी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक अमन सिरसट हे दाखल झाले असून पंचनाम करण्याचे काम सुरु असल्याची माहिती दुपारी एक वाजता मिळाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पिंपळारुई येथील गहिनीनाथ नगर येथील रहिवाशी असणारे रावसाहेब महाराज आंधळे यांचे याच शिवारात शेती आहे. शेतीमधील कापूस वेचून राहत्या घरातील एका रुममध्ये साठवून ठेवला होता. सदरील कापसाची विक्री करण्यासाठी काल सायंकाळच्या वेळी गांवातीलच वाहेद गणी शेख यांचा बलोरो कंपनीचा चारचाकी पिकअप क्रंमाक एमएच 27 एक्स 6021 यामध्ये वजन करुन अठरा क्विंटल कापूस भरुन घरासमोरच लावला होता. रात्रीच्या वेळी घरातील मंडळी झोपी गेले होते. दोन अडीच्या दरम्यानची वेळ पाहता मध्यरात्रीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनी सदरील कापूस भरलेला पिकअप पळविला आहे. सदरील घटना हि रावसाहेब महराज आंधळे यांच्या घरातील मंडळी सकाळी उठल्या नंतर हा प्रकार दिसून आला यानंतर ग्रामस्थानी परिसरात शोध आसता सदरील पिकअप आढळून न आल्याने रावसाहेब महाराज आंधळे यांनी वडवणी पोलीस स्टेशन गाठत लेखी तक्रार दिली आहे. यावरुन वडवणी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक अमन सिरसट घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला असल्याची माहिती मिळाली आहे.तर दुपारी एक वाजेपर्यत याबाबत तक्रार दाखल झालेली नव्हती.