गेवराई (रिपोर्टर) तालुक्यात एकही आधिकृत वाळू ठेका चालू नसताना गोदावरी नदीतून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत आहे. येथील पोलीस प्रशासन व महसुल प्रशासनाच्या लाखो रुपयाच्या आर्थिक देवाण घेवाणीतून वाळू माफिया गोदावरी नदी दिवस रात्र अक्षरशः पोखरुन काढत आसल्याने गोदावरी नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या हप्तेखोरीमुळेच गोदावरी नदीचे हे वाटोळे होत असताना जिल्हा प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत लाचखोर अधिकारी आपले उखळपांढरे करून घेत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी आता या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालत वाळुमाफियांची दादागिरी मोडीत काढून लाच खोर अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एसपी आणि कलेक्टर यांनी गंभीर दखल दोन दिवसात घेतली नाहीतर या भागातील नागरीक जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.
गेवराई तालुक्याच्या गोदावरी काठावरील शनीचे राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, बोरगाव बु., गुंतेगाव, खामगाव, सुरळेगाव, राजापूर, गंगावाडी ही वाळू उपसा व वाहतुकीचे मुख्य केंद्र बनली आहेत. बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदी पात्राची रुंदी व खोलीदेखील वाढत आहे. वाळू उपशामुळे नदीच्या पात्रातील रुंदी कोठे कमी-जास्त झाल्याचे चित्र आहे. परिणामी पात्राची रुंदी वाढल्याने पावसाळ्यात नदीला पूर आला की नदीचे पाणी आजूबाजूला पसरून परिसरात धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रही विस्कटले जात असून, त्यामुळे आजूबाजूच्या शेतात पावसाळ्यात नदीचे पाणी शिरण्याची भिती आता या नदीकाठच्या शेतकर्यांना वाटू लागली आहे. या वाळूच्या बेसुमार उपशामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. यात नदीपात्राची रुंदी, खोली वाढून नदी पात्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नदीची खोली वाढताना ती वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक असल्याने ही खोली व वाळू उपशामुळे झालेल्या खड्ड्यात निष्पाप बळी गेलेले आहेत, यापुढे देखील अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे गेवराईतील महसूल व पोलिसांच्या हप्तेखोरीतून बोकाळलेल्या वाळू उपशाला जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधिक्षक यांनी आवर घालणे गरजेचे आहे. मात्र सर्वांच्या डोळ्यादेखत होणार्या या अवैध वाळू उपस्याला वरिष्ठांचेही पाठबळ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
—————–
एका हायवाची महिन्याला
पाच लाखापर्यंत हप्ते वाटप
गोदावरी पत्रातून अवैध वाळू उपसा करणार्या एका हायवासाठी महिन्याला चार ते पाच लाख रुपयांपर्यंत हप्ते वाटप असून यामध्ये मंडळाधिकारी, बिट अमलदार, स्थानिक पोलीस ठाणे, डीवायएसपी कार्यालय, तहसील कार्यालय, एलसीबी, ट्राफिक पोलीस, एसपी पथक, एसडीओ असे अनेकांना हप्ते वाटप करून अधिकार्यांची भरती करावी लागते यानंतर महिनाभर रात्रंदिवस बिनबोभाट वाळू उपस्याला पाठिंबा मिळत असल्याने कुठलीच कारवाई होत नाही. तर जे वाहनचालक हप्ते देत नाहीत त्याच वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या सर्व विभागाचा एक एक कर्मचारी हे हप्ते वसुलीसाठी ठरवून दिलेले असून याबाबत ची सविस्तर नावे लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील.
वाळू माफियांच्या गुंडशाहीमुळे
शेतकरी व नागरिक दहशतीखाली
——————
बेसुमार वाळू उपशामुळे नदी पात्र तर धोक्यात येतच आहे, सोबतच शेतीलाही त्याचा फटका बसत आहे. एकतर पावसाळ्यात शेतात पाणी शिरण्याची भीती असते व वर्षभर वाळू वाहतूक करणार्या वाहनांमुळे शेतरस्तेही खराब होऊन शेतात जाणे कठीण होते. तर काही ठिकाणी शेतीची पाईपलाईन फुटतात. यामधून वाळू वाहतुकीला विरोध केला तर पोलिसांचा आशिर्वाद असलेले माफिया शेतकर्यांवर हल्ले करतात. आठ दिवसांपूर्वीच तालुक्यातील सुरळेगाव येथे ऊस वाहतुकीसाठी शेतकर्यांनी तयार केलेल्या रस्त्यावरुन वाळूने भरलेले हायवा धावू लागले असताना त्याला तेथील शेतकर्यांनी विरोध केला असता शेतकरी युवराज अंकुश सिरसाट, जनार्धन नामदेव सिरसाट, देविदास भुषण सिरसाट, नारायण अंकुश सिरसाट, बळीराम नामदेव सिरसाट रा. सुरळेगाव यांच्यावर वाळू माफियांनी कोयत्याने हल्ला केला होता. अशा या वारंवार होणार्या घटनेमुळे या भागातील नागरिक व शेतकरी दहशतीखाली असल्याचे दिसून येत आहे.