बीड (रिपोर्टर) राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज पावेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी बीडचे पालकमंत्री कोण? यावर सर्वत्र चर्चा होत असतानाच भाजपाच्या राष्ट्रीय सचीव तथा बीडच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे सक्रिय समर्थक शांत आहेत. दुसरीकडे मात्र गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नावाची मंत्रिपदाबाबत चर्चा होत असतानाच धसांसह पंकजा मुंडेंना अनुकुल असलेल्या नमिता मुंदडा यांचीही मंत्रिपदाबाबत चर्चा घडवून आणली जात आहे. आमदारांना मंत्रिमंडळाची आशा आणि जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी पालकमंत्री होण्याची आस असली तरी भाजपाच्या एकंदरीत स्वभावामुळे बीड जिल्ह्याला मंत्रिपद न देता आता बस्स! म्हणत इतर जिल्ह्यांच्या नेत्यावर बीडच्या पालकत्वाचा भार दिला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि भाजपाचं राज्यातील नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्याने तू तू मै मै पहावयास मिळत आहे. परिणामी गेल्या अडीच-तीन वर्षांच्या कालखंडात पंकजा मुंडेंना भाजपाकडून सातत्याने डावललं गेल्याचे चित्र समोर आले. यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक आक्रमक झाल्याचेही पहावयास मिळाले. मात्र जसेच सत्तांतर झाले अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गपगुमान उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हापासून पंकजा मुंडे यांचे समर्थक राज्य भाजपाबाबत अथवा फडणवीसांबाबत प्रतिक्रिया देताना संयमी दिसून आले. पंकजा मुंडे याही सध्या शांत असल्या तरी संधीचं सोनं करण्याच्या इराद्यात आहेत. सत्तांतरानंतर बीडला मंत्रिपद दिलं जाणार का? पालकमंत्री कोण होणार? यावर चर्चा आणि अडगळी होत आहेत. सर्वप्रथम पंकजा यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना पालकमंत्री केलं जाईल असा साधा आणि सरल विषय समोर चर्चीला जात आहे परंतु भाजपातील एकाधिकारशाही नेतृत्व आणि निर्णयामुळे इथे पंकजांना डावलले तर मंत्री करण्यासाठी त्यांना विचारता घेतले जाईल, अशा वेळी पंकजा कोणाचे नाव पुढे करतील, यावरही चर्चा होते तेव्हा त्या चर्चेतून नमिता मुंदडा यांचं नाव समोर येतं. धस यांचं आणि पंकजांचं ऊसतोड कामगारांच्या वेळी बिनसल्याचं चित्र समोर मांडलं जातं. लक्ष्मण पवार आणि पंकजा यांचा दुरावाही लक्षात घेतला जातो परंतु लक्ष्मण पवार यांची काम करण्याची पद्धत आणि फडणवीसांसोबत असलेलं त्यांचं सख्ख्य आता कामी येईल का? याची अडगळही लावली जातेय. दुसरीकडे कधीही तळ न लागू देणारा रांगडा आमदार म्हणून ज्या सुरेश धसांकडे पाहितलं जातं तिथं भाजपाचं नेतृत्व मंत्रिपदाचं पदक देईल का? यावर चर्चा होत असतानाच भाजप यावेळेस बीड जिल्ह्याला मंत्रिपद न देता अन्य जिल्ह्याच्या नेतृत्वावर पालकत्वाचा भार देणार असंही बोललं जात असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.
…तर मेटे मंत्री झाले तर अश्चर्य नको!
राज्याच्या राजकारणात जात,पात,धर्म, पंथ याला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे भारतीय जनता पार्टी सातत्याने मताचा आणि त्या त्या विभागात पक्षवाढीचा विचार करतं. पक्षाला फायदा होईल असा निर्णय सातत्याने घेतला जातो. आता भाजपासोबत असलेले शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना गेल्या पंचवार्षिकमध्ये मंत्रिपद देण्यात आले नव्हते. विशेष म्हणजे भाजपाकडून त्यांना शब्द दिलेला होता. मेटे आणि भाजपाचं नेतृत्व असलेले फडणवीस यांच्यात चांगली गट्टी आहे त्यामुळे मेटेंना आमदार करत त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी देत फडणवीस आपली राजकीय खेळी खेळतील, अशीही चर्चा जिल्ह्यात आहे.