बीड (रिपोर्टर): पंडित दिनदयाळ उपध्याय स्वाधार योजना धनगर समाजातील इयत्ता अकरावी ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आहे तर ज्ञानज्योती स्वाधार योजना ही माळी व ओबीसी समाजातील मुला-मुलींसाठी उच्च शिक्षण घेत असताना शिष्यवृत्ती योजना आहे. मात्र या दोन्ही योजना सुरु झाल्यापासून विद्यार्थ्यांना निधीअभावी शिष्यवृत्ती मिळालेली नाही. दुसरीकडे ही योजना राबवणार्या बहुजन कल्याण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी विद्यार्थ्यांना व्यवस्थीत माहिती न देता पैशाचीही मागणी करतात. त्यामुळे या योजनेला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे.
धनगर आणि माळी व इतर ओबीसी समाजातील इयत्ता ते उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा नंबर शासकीय किंवा निमशासकीय वस्तीगृहामध्ये लागला नाही तर त्याला निर्वाह भत्ता म्हणून या दोन योजनेअंतर्गत स्कॉलरशीप दिली जाते. सदर योजना ही एक ते दीड वर्षापासून सुरु झालेली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचे फॉर्म इतर बहुजन कल्याण विभागामध्ये दाखलही केले आहेत. ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म अद्याप दाखल झालेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना टार्गेट दिलेले होते आणि ते संपले आहे. असे म्हणून त्याचा फॉर्म स्विकारला जात नाही. मधले दलाल लोकं शिष्यवृत्तीचा फॉर्म आम्ही घ्यायला लावू, मात्र पैसे लागतात, असे म्हणून विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे ज्यांचे फॉर्म दाखल नाहीत, अशा विद्यार्थ्यांची आणि ज्यांनी दाखल केलेले आहेत त्यांना निधी अभावी स्कॉलरशीप मिळत नाही. जो त्रास होत आहे त्याची सरकारने दखल घेऊन तो दूर करावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वस्तरातून होत आहे.